सांगली; सुरेश गुदले : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार गट भाजपच्या मांडवाखाली गेला. या बदलत्या राजकीय सोयरिकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली जिल्ह्यात बेरजेचे राजकारण करणार का? याची जिल्ह्यात उत्सुकता आहे.
अजित पवार गट फुटला, मात्र सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली नाही. आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुणअण्णा लाड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहिले. इतकेच नव्हे तर बहुतेक सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल तूर्त तरी कायम राहिले. जयंत पाटील यांची ही जमेची बाजू. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी पक्ष कोठे आहे? तर वाळवा, शिराळा आणि तासगाव. हे तीन तालुके म्हणजे अर्थातच जिल्हा नव्हे. राष्ट्रवादी काँग्रेस, होय आणि काँग्रेसही तात्पर्य काय तर भाजप विरोधकांची ताकद जिल्हाभर वाढवायची असेल तर आमदार जयंत पाटील यांना काय करावे लागेल? राष्ट्रवादीची ताकद राज्यभर वाढण्यासाठी ते ज्या पद्धतीने राज्याच्या कानाकोपर्यात जाऊन झटले अगदी तसेच म्हणजेच शंभर टक्के जिल्ह्यातही झटावे
लागेल. शंभर टक्के का म्हणायचे? तर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक एकचा शत्रू कोण? काय येते उत्तर? राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे पूर्वापार चालत आलेले 'मैत्र जीवांचे' नजरेआड का करायचे? काँग्रेसची म्हणजेच दादा गटाची ताकद कमी करायची. त्यासाठी काँग्रेसचे खच्चीकरण करायचे. जिल्हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सहकारी चळवळीमुळे काँग्रेस तर तळागाळात रुजलेली. अशा जिल्ह्यात वसंतदादा आणि राजारामबापू या दोन गटांतील सख्य इतिहासाने पाहिलेले आहे. या वादविषयाला पुढे चाल देण्यात पुढील पिढ्यांनी धन्यता मानली. त्यासाठी प्रसंगी भाजपलाही मदत केली.
पडद्याआडचे न दाखवलेले नाटक जास्त गाजत असते. त्यामुळे म्हटले की आता जयंत पाटील यांना शंभर टक्के झटावे लागेल. भाजपविरोधकांची शत-प्रतिशत, विश्वासार्ह मोट बांधावी लागेल. अजित पवार भाजपच्या मांडवाखाली. त्यामुळे जयंत पाटील यांना भाजपची दारे सध्या बंदच. दोघांनाही मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. एकजण ते जाहीर बोलतो. दुसरा स्मित हास्याने उत्तर देतो.