सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबतच | पुढारी

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबतच

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. तरी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकसंघ आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच सर्व नेते, पदाधिकार्‍यांनी राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

यावेळी पक्षाचे बहुतेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, अजित पवार यांनी अचानक केलेल्या बंडामुळे राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रावस्था निर्माण झाली आहे. मात्र जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये चलविचलता झालेली नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वात काम करणारे कार्यकर्ते गोंधळले नाहीत. इडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्याने चौकशीच्या फेर्‍यातून बाजूला होण्यासाठी त्या घडामोडी घडल्या आहेत. मात्र जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

आमदार नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंड केले असले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत. आत्तापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही त्यांच्यासोबतच राहून पक्षाचे काम नेटाने केले जाईल. आम्हाला कोणी आदेश दिले तरी आम्ही शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेच ऐकणार आहे.

आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, स्वर्गीय आर. आर. आबा हे कायम पवार साहेबांसोबत राहिले. शरद पवार हे आबांचे दैवत होते. आबा सर्वसामान्य कुटुंबातील असतानाही उपमुख्यमंत्रीपद, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्रीपद दिले. त्यांच्या पश्चातही आम्ही पवार साहेबांच्या सोबतच राहणार आहोत.

आमदार लाड म्हणाले, स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांच्या विचारांचा वारसा शरद पवार चालवत आहेत. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून आम्ही पवार साहेबांसोबत काम करीत आलो आहे. यापुढेही त्यांच्यासोबत काम करणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, वैभव शिंदे, चिमण डांगे, रणधीर नाईक, सुशांत देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार गटाने संपर्क केला नाही

यावेळी आ. नाईक म्हणाले, आम्हाला अजित पवार गटाने संपर्क केला नाही. आम्ही पूर्वीपासून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी एकनिष्टपणे राहून पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणीही अजित पवार यांच्याकडे जाणार नाही.

Back to top button