वाळवा तालुका शरद पवार, जयंत पाटलांसोबतच !

इस्लामपूर, मारुती पाटील : राज्यातील राजकीय भूकंपानंतर वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार भाजप सोबत गेले असले तरी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष मात्र अद्याप तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासोबतच आहे. पवारसाहेब व जयंत पाटील हाच आमचा पक्ष असून आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी दिल्या.
राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाच्या सामान्य व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे. अजित पवारांचा हा निर्णय अनेकांना रुचलेला नाही. पवार यांनी काहीही निर्णय घेतला तरी आम्ही आमचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचे येथील पदाधिकार्यांंनी जाहीर केले आहे. शरद पवार व जयंत पाटील हाच आमचा पक्ष असल्याचेही अनेकांनी सांगितले.
आम्ही साहेबांसोबतच…
राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असताना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. आ. जयंत पाटील यांनी दुपारी आम्ही साहेबांसोबतच, असे ट्विट केले आणि येथील कार्यकर्त्यांनाही धीर आला. आ. पाटील हे शरद पवारांसोबतच राहणार, याची सर्व कार्यकर्त्यांना खात्रीही होती. या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, आजचे राजकारण हे गलिच्छ पातळीवर गेले आहे. सामान्य लोकांना हे रुचलेले नाही. 2024 च्या निवडणुकीत जनता योग्य तो निर्णय देईल.
पाटील यांच्यासोबतच एकनिष्ठ
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष आ. जयंत पाटील यांच्यासोबतच आहे. लवकरच पक्षाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील हाच आमचा पक्ष आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे म्हणाले, शरद पवार व आ. जयंत पाटील यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत. माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे व माजी नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, कोण कुठे गेले तरी आम्ही सर्वजण आ. जयंत पाटील यांच्यासोबत आहोत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार व आ. जयंत पाटील यांच्यासोबतच एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे.