सांगली : नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात अजितदादांसोबत | पुढारी

सांगली : नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात अजितदादांसोबत

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात व अतहर नायकवडी यांनी आम्ही राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महापौर यांच्यासह महापालिकेतील 15 पैकी 13 नगरसेवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत राहिले आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. एक स्वीकृत नगरसेवक आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह तेरा नगरसेवकांनी आम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीतील मिरजेचे नायकवडी व थोरात हे दोन नगरसेवक मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले आहेत. महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, आम्ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत आहोत. त्यांच्यासोबतच राहू.

अजितदादा हेच नेते : नायकवडी

नगरसेवक नायकवडी म्हणाले, महापालिकेत मी राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे, पण मला संधी दिली नाही. उलट कामे अडवण्याचे काम पक्षातून झाले. जयंत पाटील हे पालकमंत्री असताना डीपीसीतून एक रुपयाही विकास निधी मिळाला नाही. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मात्र एक वर्षाच्या आतच पावणेतीन कोटींचा विकास निधी दिला आहे. अजितदादा हेच आमचे नेते आहेत. ते राष्ट्रवादीचेही नेते आहेत. मीही राष्ट्रवादीतच आहे. आमच्या पडत्या आणि चांगल्या काळात अजित पवार यांचेच आम्हाला नेहमी पाठबळ लाभले आहे.

अजितदादा सोबत : थोरात

नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, आम्हाला राजकारण माहिती नाही. राजकारणाशी देणे घेणे नाही. सत्तेत असल्यानंतर लोकांची कामे होतात. अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून आमची विकासाची कामे होतील. आम्हाला चांगला निधी मिळेल. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, मनगू सरगर, सविता मोहिते, संगीता हारगे, मालन हुलवान, काझी, पवित्रा केरीपाळे, डॉ. नर्गिस सय्यद, स्वाती पारधी तसेच जमील बागवान यांनी आम्ही जयंत पाटील यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.

गटनेते बागवान यांचा मोबाईल बंद

राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर बागवान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. दोन्ही मोबाईल नंबरवर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.

जयंत पाटील जिकडे; आम्ही तिकडे

महापालिकेतील 15 पैकी 13 नगरसेवकांनी आम्ही जयंत पाटील यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील जिकडे; आम्ही तिकडे, असे या नगरसेवकांनी सांगितले. आमची निष्ठा कायम आहे. आता आणि पुढेही जयंत पाटील यांच्यासोबतच राहणार आहोत. जयंत पाटील हाच आमचा पक्ष, असे नगरसेवकांनी सांगितले.

Back to top button