ऑनड्युटी गोवा सहलीवर गेलेल्या आठ अधिकार्‍यांच्या शिराळ्याला बदल्या

ऑनड्युटी गोवा सहलीवर गेलेल्या आठ अधिकार्‍यांच्या शिराळ्याला बदल्या

सांगली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने अधिकारी, कर्मचार्‍यांना जून 2023 पर्यंत जास्तीत- जास्त कर्ज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जत तालुक्यात जादा अधिकारी देण्यात आले आहेत. त्याचवेळी ऑनड्युटी गोवा सहलीवर गेलेल्या जत तालुक्यातील आठ अधिकार्‍यांची तडकाफडकी शिराळा तालुक्यात बदली करण्यात आली आहे. बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही कारवाई केली.

यात जत तालुक्यातील मार्केड यार्ड शाखेचे आर. टी. नाटेकर, बी. आर. दुधाळ, उमराणी शखेतील एस. ए. कांबळे, उमदी शाखेतील एस. एम. सोलनकर, एम. एम. मुल्ला, एम. एम. पाटील, एस. एम. तेली व दरीबडची शाखेतील ए. यू. वाघमारे यांचा समावेश आहे.

जिल्हा बॅँकेने एनपीए शून्य टक्के करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी थकबाकी वसुली युध्दपातळीवर असून शेतकर्‍यांच्या थकीत कर्जाला ओटीएस योजना लागू करण्यात आली आहे. मार्चपूर्वी अनेक शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला. शेतकर्‍यांचा प्रतिसाद पाहून या योजनेला जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपण्यास काही दिवसच बाकी आहेत. या मुदतीत शेतकर्‍यांची थकीत कर्ज वसुली जास्तीत- जास्त व्हावी यासाठी बॅँकेने अधिकारी, कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. सुट्टी दिवशीही या कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांच्या बांधावर जावून कर्ज वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतकर्‍यांना या ओटीएस योजनेचे फायदे सांगत त्याचा लाभ घेत कर्ज भरण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे.

जत तालुक्यातील आठ अधिकार्‍यांनी मात्र मागील शनिवारी, रविवारी बॅँकेला असलेल्या सुट्टीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात मौज मजा करण्यासाठी गेले. इकडे शाखेतील अन्य कर्मचारी मात्र सुट्टी दिवशीही कामावर येत वसुली करत होते. सात ते आठ अधिकारी जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्याला गेल्याचे त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या फोटोवरून उघड झाले.

सोशल मीडियातील फोटोमुळे तावडीत सापडले

जत तालुक्यातील वसुली वाढवण्यासाठी अन्य तालुक्यातील 16 अधिकारी, कर्मचार्‍यांची टीम जतमध्ये वसुलीसाठी पाठवली आहे. हे अन्य तालुक्यातील अधिकारी जत मार्केडयार्ड व डफळापूर शाखेत मुक्कामाला आहेत. ते स्थानिक अधिकार्‍यांसोबत वसुलीस सहकार्य करत आहे. मात्र जत तालुक्यातील हे आठ महाशय खुशाल गोवा ट्रिपवर गेले आहेत. गेले ते गेले पण गोव्यात गेलेल्या मौज मजेचे फोटो त्यांनी बॅँक कर्मचार्‍यांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले आणि तिथेच ते सापडले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news