सांगली : कवठेपिरानमधील दरोड्याचा छडा

सांगली : कवठेपिरानमधील दरोड्याचा छडा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : अत्यंत गुंतागूंत व आव्हानात्मक बनलेल्या कवठेपिरान (ता. मिरज) येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना बुधवारी यश आले. टोळीचा मुख्य सूत्रधार काक्या सरपंच काळे (वय 27, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) याला फाळकेवाडीत अटक करण्यात आली. त्याच्याकडून दरोड्यातील साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्याचे चार साथीदार मात्र फरारी आहेत.

काक्या काळे याने टार्गेट उर्फ विशाल शिंदे (रा. वांगी, जि. सोलापूर), करण शेर्‍या भोसले (माळेगाव, ता. बारामती) करण भोसले व तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने रफीक मगदूम यांच्या झोपडीवजा घरावर दरोडा टाकला होता. टोळीने दरवाजाच्या फटीतून हात घालून कडी काढून प्रवेश केला होता. कपाटातील 15 तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखाची रोकड लंपास केली होती. मगदूम यांची मुलगी तरन्नूम यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला. त्यावेळी एकाने त्यांच्या तोंडावर हाताच्या ठोशाने मारहाण केली होती.दि. 26 मे 2023 रोजी ही घटना घडली होती.

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी या दरोड्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण व सांगली ग्रामीण पोलिसांना दिले होते. ग्रामीण पोलिसांना हा दरोडा काक्या काळे याने साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. काक्या हा चिकुर्डेत राहतो. पण दरोडा पडल्यापासून तो गावाकडे फिरकलाच नसल्याची माहिती मिळाली.

पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच तो सातत्याने ठिकाण बदलून राहत होता. फाळकेवाडी येथे एका शेतात तो लपून बसल्याची माहिती मिळाली. याठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्याला पकडले. दरोड्यानंतर त्याच्या वाटणीला साडेनऊ तोळे दागिने आले होते. ते जप्त केले. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड, हवालदार मेघराज रुपनर, रमेश (आबा) कोळी, संतोष माने, सचिन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काक्या काळेविरूद्ध गंभीर गुन्हे दाखल

काक्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध आष्टा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा व घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.  लवकरच  अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news