सांगली : अग्निशमन अधिकारी विजय पवारच्‍या घरावर छापा, ७ लाखांची रोकड, १७ तोळे दागिने जप्त

सांगली :  अग्निशमन अधिकारी विजय पवारच्‍या घरावर छापा, ७ लाखांची रोकड, १७ तोळे दागिने जप्त

सांगली, पुढारी वृत्तसेवा : अग्निशमन यंत्रणा बसविल्याच्या कामाचा मोबदला म्हणून सव्वालाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेला महापालिकेचा प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार याच्या त्रिमूर्ती कॉलनीतील जोशी प्लॉटमधील घरावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बुधवारी पहाटे छापा टाकला. या छाप्यात ७ लाखांची रोकड व १७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

विजय पवारला बुधवारी जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पालिकेतील आणखी काही अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तपासाच्यादृष्टिने पथकाने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. दागिने खरेदीच्या पावत्या मिळाल्यानंतर ते त्यांना परत केले जातील, असे सांगण्यात आले.

तक्रारदार सांगलीतील आहेत. त्यांची खासगी कंपनी आहे. या कंपनीमार्फत अग्निशमन यंत्रणा बसविल्याचा अंतिम दाखल दिल्याचा मोबदला म्हणून पवारने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती सव्वालाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये पवारने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

लाचेची रक्कम टिंबर एरियातील अग्निशमन दलातील कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते. तत्पूर्वी या विभागाने कार्यालय परिसरात सापळा लावला. लाचेची रक्कम पवारने स्वीकारल्याचा 'सिग्नल' मिळताच त्याला पकडले होते. या कारवाईने पवारला घाम फुटला होता. रात्री उशिरापर्यंत पथकाने तिथेच पंचनामा केला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पहाटेच्यादरम्यान पथकाने त्याच्या घराची दोन तास झडती घेतली.

पवारचे मौन : चौकशीला प्रतिसाद नाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पवारची चौकशी करीत आहे. त्याने मौन बाळगले आहे. चौकशीला कोणताही प्रतिसाद देत नाही. तरीही दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. चौकशीतून जी काही माहिती पुढे येईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news