सांगली : धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सांगली : धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु सांगली जिल्ह्यात मात्र केवळ ढगाळ वातावरण आहे. मात्र कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातील धरणांत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे विसर्ग कायम आहे. परिणामी जिल्ह्यातील उपसा बंदी थांबली आहे.

यंदा उन्हाळा फारच तापदायक ठरला. किमान तापमान 26 तर कमाल 41 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अवकाळी पाऊसही तीन-चारच झाले. मान्सून वेळेवर येईल, अशी अपेक्षा होती; पण जून महिना संपत आला तरी पावसाळ्याचे आगमन झाले नाही. गेली दोन-तीन दिवस जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पश्चिम भागातील शिराळा, वाळवा तालुक्यात मध्यम पाऊस पडत आहे. आज दिवसभरात काही तालुक्यात तुरळक पाऊस पडला. पलूस, कडेगाव, तासगाव, मिरज तालुक्यात अधूनमधून सरी कोसळल्या. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात केवळ ढगाळ वातावरण व वारा सुटत आहे. बहुतांश ठिकाणी हवेत गारवा आहे.

कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातील धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. कोयना धरण परिसरात 31 मिमी, धोममध्ये 22, कण्हेरला 12, महाबळेश्वरला 72, नवजा येथे 82, कराडला 5 व सांगलीत 14 तर चांदोली परिसरात 37 मिमी पाऊस पडला. चांगला पाऊस पडू लागल्याने कोयना धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. धरणातून प्रतिसेंकद केवळ 1100 क्युसेक सुरू असलेला विसर्ग 2100 करण्यात आला आहे. कण्हेरमधून 24 व चांदोलीतून 570 क्युसेक पाणी सोडले जात आहे. हे पाणी कृष्णा नदीपात्रात येत आहे. यामुळे उपसाबंदी थांबली आहे.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news