सांगली : महापालिका अग्निशमन अधिकारी विजय पवार लाच घेताना जाळ्यात

सांगली : महापालिका अग्निशमन अधिकारी विजय पवार लाच घेताना जाळ्यात

सांगली, पुढारी वृत्तसेवा : अग्निशमन यंत्रणा बसविल्याच्या कामाचा मोबदला म्हणून सव्वालाखांची लाच घेताना महापालिकेचा प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय आनंदराव पवार (वय 50, रा. जोशी प्लॉट, संभाजीनगर, त्रिमूर्ती कॉलनी) याला रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत अग्निशमन यंत्रणा बसविल्याचा अंतिम दाखला दिल्याचा मोबदला म्हणून पवार याने दीड लाख रुपये लाच मागितली. तसेच दीड लाख रुपये दिले नाहीस, तर पुढील कामाचा अंतिम दाखला देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता पवार याने दीड लाखांची मागणी करून तडजोडीअंती सव्वालाख रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले.

मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टिंबर एरियातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात सापळा रचला तेव्हा तक्रारदार यांच्याकडून सव्वा लाख रुपये लाच घेताना पवार याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलिस अंमलदार अजित पाटील, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रवींद्र धुमाळ, सीमा माने, चालक वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news