शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा शहर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. बारा वर्षाने आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने शिराळा शहरातील मुस्लिम बांधव आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाहीत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिराळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष दस्तगीर आत्तार यांनी याबाबत माहिती दिली.
ते शिराळा पोलिस ठाण्यात शहर मुस्लिम समाज संघटनेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, अॅड. बाबालाल मुजावर, मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष खलिल मोमीन, सिकंदर पठाण, खिदमत ग्रुपचे अध्यक्ष फिरोज मुजावर, रफिक आत्तार, शफिशेठ मुल्ला, फिरोज मुल्ला, फारुख मुल्ला, बंदे नवाज हाफीजी, हमीद मुल्ला, अस्लम नदाफ उपस्थित होते.
दस्तगीर अत्तार म्हणाले, बारा वर्षांनी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. या दिवशी हजारो भाविक गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी शिराळ्यात येतात. जे भाविक एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते येथील गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन घेतात. शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी गुरुवारी ईदची नमाज पठण करायचे आहे, परंतु बकर्यांची कुर्बानी त्या दिवशी न देता दुसर्या दिवशी (शुक्रवारी) करावयाची आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चिल्लावार म्हणाले, आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करता फक्त नमाज पठण करायचे व ईद दुसर्या दिवशी साजरी करायची हा निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे. या बैठकीस हाजी दिलावर मोमीन, डॉ. अजीम मुल्ला वसिम मोमीन, सरफराज मुल्ला, हारुण शेख उपस्थित होते.