मिरज : नव्या रेल्वेमार्गावरुन धावली एक्स्प्रेस | पुढारी

मिरज : नव्या रेल्वेमार्गावरुन धावली एक्स्प्रेस

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम काम गतीने करण्यात येत आहे. चिंतामणीनगर येथील उड्डाणपूल पाडल्यानंतर या ठिकाणी दुहेरीकरणासाठी नवा मार्ग टाकण्यात आला आहे. या मार्गावरून आता रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमागाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम पीएम पोर्टलवरील असून हे काम जून 2024 अखेर पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी रेल्वेची सर्व यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. नांद्रे ते सांगली दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी सांगलीतील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल मोठा अडथळा होता. तो दि. 10 जून रोजी पाडण्यात आला होता.

रेल्वे उड्डाणपूल पाडल्यानंतर या ठिकाणी दुहेरीरकरणासह विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या ठिकाणी दुहेरीकरणासाठी नवा रेल्वेमार्ग आणि या मार्गावर विद्युतीकरण देखील करण्यात आले आहे. विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलापर्यंत हा रेल्वेमार्गा अप आणि डाउन असा असणार आहे. तर विश्रामबाग येथे या मार्गाचे इंटरलॉकींग करण्यात आले आहे. त्यामुळे सोयीनुसार रेल्वेला मार्ग बदलता येणार आहे. तसेच मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे देखील दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. विजयनगरपर्यंत दुहेरीकरणाचे काम करण्यात आले आहे. मिरज-म्हैसाळ उड्डाणपुलाजवळ सध्या दुहेरीकरणासाठी पूल उभारण्यात येत आहे. तर मिरज-कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेउड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे काम जून 2024 अखून पूर्ण करून या मार्गावर सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याचे रेल्वेचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे मिरज ते पुणे आणि मिरज ते लोंढा दरम्यान रेल्वेकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.

याच गतीने रेल्वे उड्डाणपुलाचे देखील काम व्हावे..

दुहेरीकरणासाठी सांगलीतील चिंतामणीनगर येथील जुना उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या ठिकाणी दुहेरीकरणाचे काम झाले आहे. हा पूल पाडल्याने तासगावकडे होणार्‍या वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे. ज्या गतीने दुहेरीकरणाचे काम झाले, त्याच गतीने उड्डाणपुलाचे देखील काम होणे गरजेचे आहे.

Back to top button