एटीएममध्ये छेडछाड करून दोन लाख रुपये काढले | पुढारी

एटीएममध्ये छेडछाड करून दोन लाख रुपये काढले

आष्टा : पुढारी वृत्तसेवा हुतात्मा बँकेच्या वाळवा शाखेतील एटीएममध्ये छेडछाड करून 2 लाख 20 हजार रुपयांची रक्कम काढून किणी येथील एकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात तिघा परप्रांतीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विकास आप्पासो माळी (वय 34, रा. किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तर कुलदीप राम बरन पाल (वय 32, रा. शिवपुरी, हरजेनदनगर, कानपूर), सचिन कुमार साहू व अनिलकुमार बंजारेपूर गौरा, जैनापूर (उत्तरप्रदेश) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

यातील सचिन साहू याला अटक करण्यात आली आहे. इतर दोघे फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.21 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि. 22 जून रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान हा प्रकार घडला. विकास माळी हे हुतात्मा बँकेच्या वाळवा शाखेच्या एटीएममधून पैसे काढताना संशयितांनी माळी यांच्या पीन क्रमांकाचा वापर केला. तसेच मशीनमध्येही छेडछाड केली. एटीएममधील 2 लाख 20 हजार रुपये रक्कम काढून घेतली. माळी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. संशयित सचिनकुमार साहू याच्याकडून 1 लाख 160 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Back to top button