कुपवाडमधील 20 कोटींचे 11 भूखंड लाटणार? | पुढारी

कुपवाडमधील 20 कोटींचे 11 भूखंड लाटणार?

सांगली : पुढारी वृत्तसेवा कुपवाडमधील 11 भूखंड (खुली जागा) मूळ मालक, नियोजित गृहनिर्माण संस्था यांच्याच नावावर आहेत. पंचवीस ते तीस वर्षे झाली तरी अद्याप या भूखंडांना महापालिकेचे नाव लागलेले नाही. बाजारभावानुसार या भूखंडांची किंमत 18 ते 20 कोटी रुपये आहे. महापालिकेचे नाव न लागल्याने या भूखंडांचा गैरव्यवहार होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बिनशेती आदेशातील अटीप्रमाणे रेखांकनातील भूखंड व रस्त्याखालील जागा कब्जेपट्टीद्वारे महापालिकेकडे देणे आवश्यक आहे. या खुल्या जागेवर सातबारा उतार्‍याला महापालिकेचे नाव लावणे बंधनकारक असते. मात्र कब्जेपट्टी न देणे, कब्जेपट्टीची नोंद न घालणे यामुळे अशा खुल्या जागेवर मूळ जमीन मालक अथवा नियोजित गृहनिर्माण संस्था, कार्यरत गृहनिर्माण सोसायट्यांची कब्जेदार सदरी नावे राहिली आहेत. त्यामुळे खुल्या जागांची परस्पर विल्हेवाट, विक्री, हस्तांतरण अथवा अतिक्रमण करून गैरवापर करण्याचे प्रकार आढळून येत आहेत. दरम्यान, कुपवाडमधील 11 खुल्या जागांबाबत संबंधित क्षेत्रांचे रेखांकन व बिनशेती होऊन पंचवीस ते तीस वर्षे झाली आहेत. मात्र अद्याप या खुल्या जागांना महापालिकेचे नाव लागले नाही.

कुपवाडमधील स.न. 41/1/अ/1/ब/1 व 2 मधील 4740 चौ. मी. खुल्या जागेला नियोजित धरती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव आहे. स.नं. 42/1/ब/41/1/ब मधील 965 चौ.मी. खुल्या जागेला विनायक सुतार यांचे नाव आहे. स.नं. 42/3/42/4 मधील 1537 चौ.मी. खुल्या जागेला विजयकुमार कोरे यांचे नाव आहे. स.नं. 42/5/43/4/44/45/2/47/ 1 ते 7 मधील 2279 चौ.मी. मधील खुली जागा क्रमांक 1 ला नियोजित संगम को. हौ. सोसा युनिट नंबर 2 चे नाव, स.नं. 42/5/43/4/44/45/2/47/ 1 ते 7 मधील 4608 चौ.मी. मधील खुली जागा क्रमांक 2 ला नियोजित संगम को. हौ. सोसा युनिट नंबर 2 चे नाव, स.नं. 42/5/43/4/44/45/2/47/ 1 ते 7 मधील 994 चौ.मी.खुली जागा क्रमांक 3 ला नियोजित संगम को. हौ. सोसा युनिट नंबर 2 चे नाव, स.नं. 42/5/43/4/44/45/2/47/ 1 ते 7 मधील 8103 चौ.मी. खुली जागा नियोजित संगम को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटीचे नाव आहे. या खुल्या जागांना महापालिकेचे नाव लावावे यासाठी आयुक्त सुनील पवार यांना पत्र दिले आहे, अशी माहिती नगरसेवक विष्णू माने यांनी दिली. या खुल्या जागेचे अंदाजे क्षेत्र 5 एकर 32 गुंठे आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत 18 ते 20 कोटी रुपये आहे. या खुल्या जागांना महापालिकेचे नाव न लागल्यास खुल्या जागा हडपण्याची दाट शक्यता आहे, असेही नगरसेवक माने यांनी म्हटले आहे.

Back to top button