मिरजेत घरफोड्यांची टोळी जेरबंद; सहा गुन्ह्यांचा छडा | पुढारी

मिरजेत घरफोड्यांची टोळी जेरबंद; सहा गुन्ह्यांचा छडा

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  शहरात घरफोड्या करणार्‍या टोळीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरुवारी पहाटे तीन वाजता पकडण्यात शहर पोलिसांना यश आले. यामध्ये मिरजेतीलच पाच जणांचा समावेश आहे. ते पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत. त्यांच्याकडून सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अटक केलेल्यांमध्ये महंम्मद कैस फैय्याज मुल्ला (वय 20, गुरुवार पेठ), आरबाज फैय्याज वांगरे (22), लुमान अजीज गद्याळपटेल (22, दोघे रा. किल्ला भाग), शाहीद मुनीर गोदड (22), फैय्याज सिकंदर गोदड (19, दोघे रा. गोदडमळा, टाकळी रोड, मिरज) यांचा समावेश आहे. सहा महिन्यांपासून शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसप्रमुख
डॉ. बसवराज तेली यांनी गस्त वाढविण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक संजीवकुमार खाडे, उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी गुरुवारी पहाटे बोलवाड रस्त्यावर लक्ष्मीमाता कॉलनीत एक बंद घर फोडून दोन चोरटे घुसले असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने टोळीतील दोघांना घरात घुसून चोरी करताना रंगेहाथ पकडले. त्यांनी आणखी तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यांनाही पकडले. पाच जणांच्या चौकशीत त्यांनी सहा महिन्यात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच व महात्मा गांधी चौकच्या हद्दीत एक अशा सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने, कपडे, मोबाईल व रोकड असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक खाडे यांनी सांगितले.

Back to top button