Sangli Crime News : टोळीचा सांगली पोलिसांना बिहारमध्ये गुंगारा | पुढारी

Sangli Crime News : टोळीचा सांगली पोलिसांना बिहारमध्ये गुंगारा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील रिलायन्स ज्वेल्स या पेढीवर दरोडा टाकून पंधरा दिवसाचा कालावधी होत आला तरी सांगली पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलेले नाही. टोळी बिहारची असल्याचा निष्कर्ष काढून पथक तिकडे रवाना झाले. गेल्या दहा दिवसांपासून पथक तिथे तळ ठोकून असले तरी टोळीने त्यांना गुंगारा देत तेथूनही ‘धूम’ ठोकली आहे. टोळीने सात राज्यात अशाचप्रकार गोळीबार करीत दरोडे टाकल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ वसंत कॉलनीत ‘रिलायन्स ज्वेल्स’ ही पेढी आहे. दि. 4 मे रोजी सहा ते सात जणांच्या टोळीने गोळीबार करीत भरदिवसा दरोडा टाकला होता. सुमारे 15 कोटी रुपयांचा ऐवज लंपास करून टोळीने क्षणात पोबारा केला होता. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. दरोडा टाकल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात ते मिरज व आणि भोसे येथे पोहोचले. तिथे वाहने सोडून ते पसार झाले. कारमध्ये दोन रिव्हॉल्व्हर व तामिळनाडूतील दोन बोगस आधारकार्ड सापडली होती. पुढील प्रवासात कुठे अडकू नये, यासाठी त्यांनी रिव्हॉल्व्हर कारमध्येच टाकली होती.

गणेश नामक व्यक्ती दरोडा टाकण्यापूर्वी एक दिवस अगोदर पेढीत जाऊन आला होता. ते पेढीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैदही झाला होता. त्याची माहिती काढल्यानंतर तो हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली. हैदराबादमध्ये छापे टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत हा दरोडा बिहारमधील टोळीने टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन पथके बिहारला रवाना झाली. तेथील पोलिसांच्या मदतीने टोळीचा शोध घेण्यात आला. त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. ही टोळी सराईत आहे. एकाचठिकाणी ते फार काळ मुक्काम करीत नाहीत. ओडिसा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह सात राज्यात त्यांनी दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

टोळीपर्यंत पोहोचण्यात पथकांना यश आले. मात्र पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच टोळीने तेथूनही पलायन केले आहे. आणखी काही दिवस बिहार राज्यातच मुक्काम करून टोळीच्या मुसक्या आवळण्याचे नियोजन पथकाने केले आहे. टोळी लवकरात लवकर हाती लागण्याची गरज आहे. लुटलेल्या ऐवजाची त्यांनी विल्हेवाट लावली तर याचा तपासावर परिणाम होऊ शकतो.

टोळी दहा वर्षांपासून सक्रिय

दरोडा टाकणारी ही टोळी गेल्या दहा वर्षापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. मोठ-मोठी ज्वेलर्सची दुकाने व बॅकामध्ये ते भरदिवसा दरोडा टाकतात. एक-दोन वेळाच ती अटक झाली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ते एकाही न्यायालयीन सुनावणीला हजर राहिले नाहीत. सात राज्यातील पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

Back to top button