सांगलीपूर्वी कोल्हापूर येथे टाकणार होते दरोडा

सांगलीपूर्वी कोल्हापूर येथे टाकणार होते दरोडा

सांगली; सचिन लाड : येथील 'रिलायन्स ज्वेल्स' या पेढीवर दरोडा टाकणार्‍या टोळीने प्रथम कोल्हापुरातील मॉलमध्ये असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती हैदराबाद येथून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सहाजणांच्या चौकशीतून पुढे आली आहे. कोल्हापूरच्या मॉलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांनी तेथील बेत रद्द करून दरोड्यासाठी सांगली निवडल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरोडा टाकणारी ही टोळी बिहारची असल्याचे निष्पन्न झाले आहे. आठजणांची ही टोळी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातच रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्याचे टोळीने ठरविले. यासाठी ही टोळी 15 मे रोजी कोल्हापुरात दाखल झाली. तामिळनाडू येथील बनावट आधार कार्डवर त्यांनी काही लॉजवर मुक्काम केला. एका लॉजवर ते दोन दिवसापेक्षा अधिक थांबले नाहीत. संशय येऊ नये म्हणून ते सातत्याने लॉज बदलत गेले. 30 मेपर्यंत ते लॉजवर राहिले. दिवसा आणि रात्रीच्यावेळी ते कोल्हापुरातील मॉलमध्ये जात होते. तेथील रिलायन्स ज्वेल्स या पेढीची ते रेकी करीत होते. मात्र मॉलमध्ये गर्दी खूप असायची. येथील दरोडा यशस्वी होणार नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कोल्हापुरातील मुक्काम हलविला.

31 मे रोजी सांगली गाठली!

कोल्हापुरातील लॉजवर एका रुममध्ये दोघे-दोघे राहात होते. 'बिहारसे हम आये है, काम फत्ते कर के जायेंगे', असा निर्णय घेऊन त्यांनी 31 मे रोजी सांगली गाठली. सांगलीतही एका लॉजवरच त्यांनी मुक्काम ठोकला. एक जून रोजी त्यांनी सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्स या पेढीची पाहणी केली. टोळीतील सर्वजण वेळ बदलून 3 जूनपर्यंत पेढीत जाऊन टेहळणी करून येत होेते. दरोड्यासाठी हे रिलायन्स ज्वेल्स ओके असल्याची खात्री पटताच त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांनी दरोड्याचा बेत आखला. वेळ ठरली… दुपारी तीनची… साडेतीनपर्यंत गोळीबार करीत त्यांनी दरोडा टाकून सुमारे 15 कोटी रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केला.

कर्नाटक गाठले!

दरोडा टाकल्यानंतर या टोळीने मिरज व भोसे येथे वाहने सोडून देऊन रेल्वेमार्गे थेट कर्नाटक गाठल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्नाटकातून ते कुठे गेले याची अद्याप सांगली पोलिसांना माहिती लागली नाही. आज ना उद्या ते बिहारमध्ये येतील, या शक्यतेमुळे सांगली पोलिसांची पथके तिथे तळ ठोकून आहेत. लवकरच या टोळीला गजाआड करण्यात यश येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

सातार्‍यात बँकेवर दरोडा टाकण्याचा बेत

बिहारमधून आलेली ही टोळी प्रथम सातार्‍यात आली होती. तिथेही त्यांनी दोन दिवस मुक्काम करून एका राष्ट्रीयीकृत बँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचला होता. ते बँकेत दोन दिवस जाऊनही येत होते. मात्र या बँका अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी होत्या. तसेच ग्राहक खूप असायचे. हे ठिकाणही दरोड्यासाठी योग्य नसल्याने त्यांनी सातार्‍यातील मुक्काम हलवून कोल्हापूर गाठले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news