‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडा प्रकरण : परराज्यातील दोघांची नावे निष्पन्न | पुढारी

‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडा प्रकरण : परराज्यातील दोघांची नावे निष्पन्न

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील‘ रिलायन्स ज्वेल्स’ वर गोळीबार करीत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणार्‍या टोळीतील दोघांची नावे निष्पन्न करण्यात सांगली पोलिसांना बुधवारी यश आले. टोळीतील हे दोघेही परराज्यातील आहेत. दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार ठाण्यातून, तर दुचाकी कर्नाटकातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, दरोडा टाकण्यापूर्वी आदल्यादिवशी टोळीतील एकजण पेढीत येऊन रेकी करून गेल्याची माहिती पुढे आली आहे. हा संशयित सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैदही झाला आहे.

सांगली, मिरज रस्त्यावर मार्केट यार्डात वसंत कॉलनीत ‘रिलायन्स ज्वेल्स’ या पेढीवर रविवार 4 मे रोजी सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून पंधरा कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. टोळीने एका ग्राहकावर गोळीबार केला होता. ग्राहकाने पलायन केल्याने तो बचावला. मात्र पेढीच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच फुटली होती. घटनेच्या दुसर्‍यादिवशी टोळीने गुन्ह्यात वापरलेली कार भोसे (ता. मिरज) येथे शेतात, तर दुचाकी मिरजेतील समतानगरमध्ये सापडली होती.

शनिवार 3 जूनरोजी सायंकाळी सव्वापाच वाजता टोळीतील एकजण पेढीत गेला होता. त्याने दागिन्यांची खरेदी करणार आहे, असे सांगून त्याच्या किंमतीबाबत चौकशी केली. हा संशयित दरोडेखोर पेढीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही सर्व नवीन माहिती बुधवारी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याचे नाव गणेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो हैदराबाद येथे गेल्याचे पोलिसांना समजले
होते.

चार दिवसात छडा लागण्याची शक्यता

‘टीम’ने बिहारमधील पोलिसांची मदत घेऊन दरोडेखोरांची नावे निष्पन्न केली. ही टोळी पाच जणांची आहे. या टोळीने ओडिसा, आंध्र प्रदेशमध्ये अशाचप्रकारे दरोडे टाकल्याची माहिती मिळाली आहे. दरोडा टाकल्यानंतर टोळीने त्यांची वाहने मिरज व भोसे येथे सोडून पलायन केले होते. कदाचित ते रेल्वेने गेले असण्याची शक्यता आहे.

Back to top button