

वाळवा ; पुढारी वृत्तसेवा : येथील द्राक्ष दलाल सागर उत्तम महाजन (रा. चांदोली वसाहत) याने येथील 11 द्राक्ष बागायतदार शेतकर्यांची द्राक्षे खरेदी केली. त्यांना बोगस धनादेश देऊन 48 लाख रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद विजय वसंत नवले (रा. हाळभाग वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी महाजन याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : महाजन हा वाळव्यामध्ये द्राक्षे खरेदी करतो. शेतकरी उधारीवर त्याला द्राक्षे देतात. असा व्यवहार गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. मात्र, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून अनेक शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे महाजनने पैसेच दिले नाहीत. त्याने दिलेले धनादेशही वटले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
विजय नवले यांना त्याने 9 लाख 50 हजार रुपये दिले नाहीत. अनेक वायदे केले. अखेर सात लाखांचा धनादेश दिला. पत्नीच्या नावे 2 लाख 50 हजारांचा धनादेश दिला. परंतु; ते दोन्ही धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यांची फसवणूक झाली अशी त्यांची तक्रार आहे.
वाळव्यातील फसवणूक झालेले इतर शेतकरी असे : अशोक माळी (9लाख 50 हजार), राहुल मगदूम (2लाख 50 हजार), संजय रुगे (5 लाख), प्रकाश पवार (4 लाख), शहाजी थोरात (3 लाख 50 हजार), विठ्ठल माळी (4 लाख),अनिकेत वाजे (3 लाख), प्रवीण मगदूम(3 लाख), मनोज कवठेकर (4 लाख), सतीश नवले (2 लाख) अजूनही बरेच शेतकरी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे द्राक्षबागायतदारांची मोठी फसवणूक झाल्याची वाळवा परिसरात चर्चा आहे.