LokSabha election : हातकणंगलेत चौरंगी लढतीची शक्यता | पुढारी

LokSabha election : हातकणंगलेत चौरंगी लढतीची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  लोकसभेच्या निवडणुकीस अजून वर्षभराचा कालावधी असला तरी शाब्दिक खडाखडी सुरू झालेली आहे. मैदान मारण्याची भाषा बोलली जात आहे. घोडामैदान दूर असले तरी पैलवान मात्र शड्डू ठोकून हाकारा पिटत आहेत. तर्क-वितर्काची गणिते मांडली जात आहेत. जाहीरपणे उमेदवारी मागितली जात आहे.

जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघातही इच्छुकांना अर्थातच निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. या मतदारसंघात दुरंगी नव्हे तर चौरंगी लढत होऊ शकते. अजून पावसाळा सुरू व्हावयाचा आहे, पूर-महापूर येऊ शकतो. किती राजकीय पाणी कसे-कसे वाहते, त्यावर अंतिम चित्र अवलंबून राहील.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या पाहता काँग्रेसचा मतदारसंघ. स्वातंत्र्यानंतर देशात सर्वत्र काँग्रेसच होती तर हा मतदारसंघ तरी कसा अपवाद राहील? अर्थातच स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघाने साथ दिली ती काँग्रेसला. खासदार बाळासाहेब माने या मतदारसंघातून आरामात विजयी होत असत. थोडे मागे पाहिल्यास 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर खासदार बाळासाहेब माने यांच्या सून निवेदिता माने राष्ट्रवादीत दाखल झाल्या. 1999 आणि 2004 अशा दोन्ही निवडणुकीत निवेदिता माने यांनी या मतदारसंघाचे सलग दहा वर्षे नेतृत्व केले. 2009 च्या निवडणुकीत मात्र त्या शेतकरी संघटनेचे वजनदार नेते राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या. परिणामी मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. 2014 मध्ये शेट्टी यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 2019 मध्ये निवेदिता यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला आणि ते खासदार झाले. सध्या धैर्यशीलच शिवसेनेचे खासदार आहेत. ते सध्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहेत.

या राजकीय नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या चित्राकडे पाहावे लागेल. शिवसेनेची आता दोन शकले झालेली आहेत. अर्धी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडवात आहे. राहिलेली अर्धी-मुर्धी शिंदे शिवसेना भाजपच्या मांडवात-सत्तेच्या अंगणात नांदते आहे. दोन्ही शिवसेनेतील विळ्या-भोपळ्याचे सख्य घरातल्या इडियट बॉक्सवर रोज पाहावे लागते. भाजप-शिंदे शिवसेनेला निवडणुकीत एकत्रितपणे जोरकस विरोध करण्याचा निर्धार व्यक्त झालेला आहे. काही धुसफूस साहजिक असली तरी भाषा एकीची आहे. सर्व विरोधक एक झाले तर भाजपचा पराभव सहज शक्य आहे, अशी जुनीच मांडणी नव्याने जोमाने केली जात आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहील, याची ग्वाही जो तो देतो आहे.

या घडामोडींपासून राजू शेट्टी मात्र दूरच आहेत. त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला नाही, ना कोणाचा घेतलेली वार्ता सध्या तरी नाही. एकला चलो रे…अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. शिवसेनेची दोन शकले झाली असली तरी उद्धव ठाकरे गटाविषयी जनमताची सहानुभूती आहे. शिंदे गट सत्तेत आहे, तरीही त्यांचे कथित बंड मूळचा शिवसेनेचा पिंड असणार्‍या कार्यकर्त्यांना, शिवसेनेला मानणार्‍या लोकसमूहाला आवडलेले दिसत नाही. याचे काही एक प्रतिबिंब निवडणुकीत उमटल्या वाचून राहणार नाही. येथे लक्षात घ्यायला हवे की धैर्यशील माने शिंदे गटात आहेत आणि हीच त्यांची गोचीही ठरू शकते. हातकणंगलेच्या जागेविषयी शिंदे गट आग्रही राहणार. कर्नाटकने जरी धडा शिकवला असला तरी भाजप लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी देशभर निकराने झुंजतो आहे. त्यामुळे कोल्हापूरची जागा शिंदे शिवसेना गटाला देऊन हातकणंगलेच्या जागेसाठी भाजप आग्रही राहील. भाजपकडे सक्षम उमेदवार नसला तरीही प्रसंगी धैर्यशील यांनाच पावन करून भाजपात घेतले जाऊ शकते. असे झालेच तर काँग्रेस ते राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असा माने घराण्याचा राजकीय प्रवास होईल.

भाजपतर्फे धैर्यशील रिंगणात राहिल्यास महाविकास आघाडीतर्फे कोण उमेदवार असेल याची मोठी उत्सुकता असेल. हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूरची जागा उद्धव ठाकरे शिवसेना गटाला दिली जाऊ शकते. भाजपतर्फे कोल्हापूरची जागा शिंदे शिवसेना गटाला दिली जाऊ शकते. अशा तर्र्‍हेेने कोल्हापुरात शिवेसेनेच्या दोन गटात कुस्ती रंगू शकते. शिंदे गटातर्फे द्विधा मनस्थितील संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे. अंदाज असा की कोल्हापुरात शिवसेनेचे दोन गट तर हातकणंगलेत महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना होऊ शकतो.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलो रे असे म्हटले असले तरी वंचित बहुजन आघाडीबरोबर त्यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेट्टी स्वतंत्रपणे, भाजपतर्फे धैर्यशील माने, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजीराव नाईक किंवा दिलीप पाटील, प्रसंगी अपक्ष सदाभाऊ खोत अशी चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.

जयंत पाटील यांचा प्रभाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हातकणंगले मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. त्यांचा वाळवा तालुका या मतदारसंघात येतो. वाळवा आणि शिराळा या तालुक्यांवर त्यांची पकड आहे. या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर राहील. सांगलीची जागा काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता कमी. त्यामुळे हातकणंगलेविषयी जयंत पाटील खूपच आग्रही राहतील.

सदाभाऊ खोत यांची अपक्ष लढण्याची तयारी

सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे हातकणंगलेतून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी प्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तशी घोषणाही एका कार्यक्रमात त्यांनी केली आहे. परंतु याबाबत पक्षाची भूमिका काय राहते ते पाहावे लागेल.

Back to top button