सांगली : सावर्डेत भवानीच्या डोंगराला लावली आग | पुढारी

सांगली : सावर्डेत भवानीच्या डोंगराला लावली आग

तासगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सावर्डे येथील भवानी डोंगराला शुक्रवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तिने आग लावली. २५ एकराचा परिसर भीषण आगीच्या भक्षस्थानी आला. वन विभाग, अग्निशामन विभागाचे कर्मचारी, चिंचणी, सावर्डे आणि मणेराजुरी ग्रामस्थ यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.

चिंचणी, सावर्डे ,मणेराजुरी या गावच्या तसेच वन विभागाच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावर डोंगर पसरला आहे. डोंगरावर दरवर्षी वन विभाग व वृक्ष प्रेमी शेकडो झाडांची लागवड करतात. या डोंगरामध्ये कोल्हे, तरस लांडगा, मुंगूस, सायाळ, घुबड, मोर, लांडोर, लाव्हार, चित्तर, घोरपड, नाग, चिमण्या, पोपट, घारी, खोकड, यांसह शेकडो प्राणी व पक्षी आहेत. शुक्रवारी दुपारी चिंचणी गावच्या हद्दीत डोंगराला आग लागल्याचे काही ग्रामस्थांसह वृक्षप्रेमींच्या निदर्शनास आले होते. संबंधित मंडळी डोंगराकडे धावले. वारा वेगाने सुटला असल्याने आग वेगाने वाढत होती. आगीने रौद्ररूप धारण करत वेगाने पसरु लागली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आगीची माहिती मिळताच तासगावच्या वनविभागाचे वनसंरक्षक रवींद्र कोळी यांच्यासह कर्मचारी दुर्घटनास्थळी दाखल झाले. डोंगराची आग विझवण्यास सुरुवात केली. आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेचे प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी अग्निशामनची गाडी तात्काळ सावर्डे येथे पाठवली. आग डोंगरावर पसरत गेल्याने आग विझवण्यास अडथळे येत होते. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास यश आले.

हेही वाचंलत का?

Back to top button