भाजप-शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा मिळतील : बावनकुळे | पुढारी

भाजप-शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा मिळतील : बावनकुळे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला ४५ प्लस तर विधानसभेत दोनशे प्लस जागा मिळतील असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते शुक्रवारी आखाडा बाळापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला. आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या रक्तामध्येच भाजपा आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्या समर्थपणे चालवत आहेत. त्यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याचा विचारही कोणी करू नये. उलट त्यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक बळकट होत आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका भाजपा शिवसेना युती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. या निवडणुकांमधून युतीला मोठे यश मिळणार असून विधानसभेला दोनशे प्लस तर लोकसभेला ४५ प्लस जागा मिळतील असा दावा त्यांनी केला.

खासदार संजय राऊत यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांची नियुक्ती केली आहे. तेच राऊत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतील. ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला त्या सामना या वृत्तपत्राकडून काय अपेक्षा ठेवणार, सामना हे आता काँग्रेसचे मुखपत्र झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा शिवसेना युतीचे सिंहासन अधिक मजबूत झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शिवसेना भाजपा युती अधिक मजबूत असून पुढील पंधरा वर्षे युतीचे सरकार कायम राहणार आहे. वज्रमुठला तडा जाईल पण युतीला तडा जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष हा महासागर असून पक्षामध्ये येणार्‍या सर्वांना सामावून घेण्याची ताकद पक्षामध्ये आहे. त्यामुळे ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांचे स्वागत आहे. पक्षात येऊ पाहणार्‍यांना आपण खुली ऑफर देत असून त्यांना पक्षात आल्यानंतर पक्षाच्या विचाराने, राष्ट्रहितासाठी काम करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

Back to top button