आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दबावाखाली आणि सहकार्यानेच शेकाप,काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने राजकीय षडयंत्र रचले. स्वर्गीय बाबासाहेब देशमुख आणि गणपतराव देशमुख यांचे आणि दोन तालुक्याचे नैसर्गिक नाते ॲड. बाबासाहेब देशमुख यांच्या विश्वासघाती निर्णयाने तडकले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले.
माणगंगा निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या प्रयत्नातून कारखाना आणला. आटपाडी,सांगोला आणि माण तालुके हे कार्यक्षेत्र होते. सांगोला तालुक्यातील गणपतराव देशमुख यांचे कायम मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. मागील सर्व निवडणुकीत समन्वयाने काम झाले.
या निवडणुकीसाठी ॲड.बाबासाहेब देशमुख यांच्याशी मी पुढाकार घेऊन कारखाना सुरू करणार अशी भूमिका मांडत चर्चा केली. एकत्र जायचे ठरले. आम्ही अर्ज देखील एकत्र भरले. दोन दिवसांपूर्वी निवडणुकीबाबत चर्चा झाली. परंतु अर्ज माघारी दिवशी ॲड.देशमुख यांनी आम्ही सोबत नाही असे सांगत विश्वासघात केला. दबावाखाली त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप अमरसिंह देशमुख यांनी केला.
अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी सांगितले असते तर आम्ही दुसरे उमेदवार दिले असते. निवडणूक जिंकली देखील असती. परंतु राष्ट्रवादीच्या दबावाखाली शेकाप, दोन्ही तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांनी राजकीय खेळी आणि आम्हाला माघार घ्यावी लागली असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले आटपाडीच्या देशमुखांना संघर्ष नवा नाही.आम्ही कोणाच्या कामात अडथळा आणत नाही.परंतु आमच्या कामात मात्र जाणीवपूर्वक अडथळा आणला जातो असे सांगत आणि थेट उल्लेख न करता देशमुख यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
निवडणूक लागल्यानंतर आमदार अनिल बाबर यांची देशमुख यांनी भेट घेतली असता त्यांनी आम्ही निवडणूक लढवणार नाही असे संगितले होते. या निवडणूक प्रक्रियेत आमदार अनिल बाबर हे अलिप्त होते असे सांगितले.
जिल्हा बँकेने कारखाना लिलावासाठी प्रयत्न केले पण कोणी आले नाही.एन.पी.ए.वाढत चालल्याने कारखाना बँकेने विकत घेतला. त्यानंतर बँकेने कारखाना चालवायचे टेंडर काढले.ते फक्त आम्ही भरले.ते देखील बँकेने मंजूर केले नाही.हा कारखाना चालू होऊ नये म्हणून देखील कारस्थाने झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
विधानसभेला अनिल बाबर यांना सहकार्य कराण्यासाठी जिल्हयातील भाजपा व वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले.कारखान्यासाठी सहकार्य व्हावे म्हणून मात्र भाजपच्या कोणी पुढाकार घेतला नाही. यांची मला खंत आहे
– अमरसिंह देशमुख