सांगली: शिराळा तालुक्यात धूळवाफ पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

शिराळा;पुढारी वृत्तसेवा: शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे. रखरखत्या उन्हात बळीराजा रब्बी हंगामातील पिकांची काढणी करून खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतीची पूर्व मशागत करून शेती पेरणीसाठी तयार करीत आहेत़. त्यामुळे तालुक्यातील शेत शिवारे गजबजून गेली आहेत.
वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक अडचणींवर मात करत शेतकरी सर्व दुःख बाजूला सारून यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल, या आशेवर रखरखत्या उन्हाचे चटके सोसत शेतीची मशागत जोमाने करू लागला आहे.
रोहिणी नक्षत्रावर शिराळा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील धूळवाफ पेरणी करतो. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सरसावला असून पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेत असल्याचे चित्र आहे़.
काही ठिकाणी बैलजोडीच्या साहाय्याने तर काही ठिकाणी ट्रक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत सुरू आहे. शेतातील वाळलेले पाचट, तण वेचणे, शेणखत टाकणे, बांध घालणे अशी कामे उरकण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक ठिकाणी कुरीच्या साह्याने बळीराजा पेरणी करू लागला आहे.
हेही वाचा