सांगली : अ‍ॅक्सिलेटरला दोरी बांधून चालविली बस | पुढारी

सांगली : अ‍ॅक्सिलेटरला दोरी बांधून चालविली बस

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा :  कवठेमहांकाळ-घाटनांद्रे मार्गावर कुची-जाखापूरजवळ एका बसचा अ‍ॅक्सिलेटर अचानक नादुरुस्त झाला अन् 40 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. पण चालकाने महिला वाहकाच्या मदतीने दोरीने अ‍ॅक्सिलेटर बांधून तब्बल 40 किलोमीटर अंतर सुरक्षितपणे पार केले अन् प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गाड्यांची कमतरता, चालक – वाहक कमी अशी कवठेमहांकाळ आगाराची सध्या अवस्था आहे. सुटीमुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच आगारात नादुरुस्त गाड्यांचा भरणा आहे. अनेक बस नादुरुस्त असल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात नाही. जवळच्या बस सोडल्या जातात. गुरुवारी, (दि. 25) सायंकाळी पावणेसहा वाजता कवठेमहांकाळ – घाटनांद्रे ही बस मार्गावर जात होती. या बसचा अ‍ॅक्सिलेटर अचानक नादुरुस्त झाला. पण चालक, वाहकाने प्रसंगावधान राखून दोरीने अ‍ॅक्सिलेटर बांधला. महिला वाहकाने या दोरीने अ‍ॅक्सिलेटरचे नियंत्रण केले. अशा पद्धतीने 40 किलोमीटर अंतर पार करत बस सुरक्षित नेली.

Back to top button