सांगली : ना चारा ना पाणी; कुरण विकास क्षेत्र पडून | पुढारी

सांगली : ना चारा ना पाणी; कुरण विकास क्षेत्र पडून

देवराष्ट्रे; विठ्ठल भोसले : भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य असलेल्या स्व. यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे हरणांच्या विविध जातींसाठी प्रसिद्ध तर आहेच, पण इथला निसर्गही नयनरम्य आहे. पण निसर्गाचे हे देणे सांभाळायला वनविभाग सपशेल अपयशी ठरला आहे.

अभयारण्यातील हरणांच्या ओल्या चार्‍याचा व काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पाऊस न झाल्याने अभयारण्याच्या परिसरात प्राण्यांसाठी चारा मिळत नाही. वनविभागाने अभयारण्यात चारानिर्मिती करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून केलेले कुरणही जैसे-थेच आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व पलूस तालुक्यांच्या सरहद्दीवर 10.87 चौ.कि.मी. परिसरात वसलेले सागरेश्वर अभयारण्य. माजी वनमंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्याचा विकास करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. कोट्यवधींचा निधी खेचून अनेक विकासकामे केली, पण नंतर मात्र दुर्लक्ष्य झाले.

नव्वदच्या दशकात अभयारण्यात मोजकीच हरणे होती. त्यानंतर त्यांंना अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्रात मुक्त करण्यात आले. हरणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. खरे तर ही आनंदाची गोष्ट, पण वाद वेगळाच आहे. मुळची वन्यजीव विभागाची असणारी हरणे बाहेर पडली. ही हरणे अभयारण्यातील म्हणजे वन्यजीव विभागाची की बाहेर पडून मोकाटचा शिक्का बसलेली प्रादेशिक वनविभागाची? हा वाद सुरूच आहे.

पाणी नाही आणि कुंपण जोरात

सुरुवातीच्या काळात बंधारे, तलाव, विहिरी, शेततळी यांबरोबरच ताकारी योजनेचे पाणी अभयारण्यात घेतले. त्यामुळे अभयारण्याच्या इतिहासात प्रथमच मुबलक प्रमाणात पाणी पाहावयास मिळाले. त्यानंतर मात्र प्रशासनाने ओला चारा निर्मितीसाठी काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

हरणे बाहेर जातातच का?

डिसेंबर ते जूनदरम्यान अभयारण्यात ओल्या चार्‍याची खूप कमतरता असते. सारे गवत वाळून गेले आहे आणि जे आहे त्याला कुसळे आल्यामुळे हरणे गवत खात नाहीत. यामुळेच हरणे अभयारण्याबाहेर पडतात आणि शेतकर्‍यांच्या भाजीपाला, शाळू, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. अभयारण्याबाहेर आल्याने अनेक हरणांचा मृत्यू झाला. यावर वन विभागाने अभयारण्याच्या 35 कि.मी. लांब सीमारेषेला संरक्षक जाळीचे कुंपण घातले. त्यापेक्षा हरणे अभयारण्याबाहेर का जातात, याचा विचार करून उपाय करण्याची गरज होती.

Back to top button