सांगली : एचआयव्ही बाधितांच्या शोधमोहिमेला यश | पुढारी

सांगली : एचआयव्ही बाधितांच्या शोधमोहिमेला यश

सांगली; नंदू गुरव : जिल्ह्यात आज 10 हजार 554 एचआयव्ही बाधित आहेत. हे रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेत आहेतच, पण यांच्याशी संवाद साधत या रुग्णांच्या घरच्या, संपर्कातल्या, ओळखीतल्या काहींना एचआयव्हीची लक्षणे जाणवत असतील तर त्यांना शोधण्याची आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्याची मोहीम जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने हातात घेतली आहे. त्याला मोठे यश मिळते आहे.

काही वर्षांपूर्वी एचआयव्ही आणि एडस् या शब्दाचीही दहशत वाटावी इतकी भीती समाजाच्या मनात होती, पण आता ही भीती हळूहळू कमी होत आहे. जे एचआयव्हीग्रस्त आहेत तेही नियमीतपणे औषधोपचार घेत आहेत. पण असे सारे असले तरी एचआयव्हीची लक्षणे जाणवल्यानंतर स्वत:हून आरोग्य यंत्रणेकडे जाऊन तपासणी आणि उपचार करून घेण्याचे प्रमाण हवे तितके नाही.  यासाठीच जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडेक्स टेस्टिंग मोहीम राबवण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी सांगितले की, ज्या एचआयव्हीग्रस्तांवर उपचार सुरू आहेत ते नियमितपणे सेंटरवर येतातच. त्यांना त्यांच्या जोडीदारांना केंद्रापर्यंत आणून लवकर औषधोपचार सुरू करायचे आवाहन या मोहिमेद्वारे करीत आहोत. तुमच्या जवळच्यांना तपासायला घेऊन या. त्यांनाही बरे होऊ द्या, या विनंतीचा खूप चांगला परिणाम होतो आहे. एचआयव्हीग्रस्तांची ही शोधमोहीमच आहे. गरोदर महिलांनीही तीन-चार महिन्यांच्या आत तपासणी करण्यावर भर देत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 2020 ते 2022 या दोन वर्षांत कोरोना होता. यानंतर एप्रिल 2022 पासून इंडेक्स टेस्टिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे. त्यामुळे नवीन केसेस सापडू लागल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Back to top button