

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बुधवारी तीन ठिकाणी तीन खून झाले. एरंडोली (ता. मिरज) येथे पत्नीने पतीचा खून केला. तिने पतीला चाकूने भोसकले. जेवण करण्याच्या कारणावरून ही घटना घडली. पत्नी फरार आहे. बेेडग (ता. मिरज) येथे मुलग्याने पित्याच्या अंगावर टॅ्रक्टर घातला आणि चिरडून ठार केले. कर्जफेड करण्यासाठी पैसे द्यावेत, जमीन नावावर करावी, अशी या मुलाची मागणी होती. त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) वेटरचा खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून हॉटेल कामगाराने डोक्यात लाकडी ओंडका घालून त्याचा खून केला .
एरंडोली (ता. मिरज) येथे जेवण करण्याच्या वादातून पत्नीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केला. सुभेदार आनंदराव काळे (वय 45) असे मृताचे नाव आहे. संशयित चांदणी सुभेदार काळे (32, रा. एरंडोली) ही फरार झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः एरंडोली येथे पारधी वस्तीवर काळे दाम्पत्य राहते. बुधवारी दुपारी सुभेदार जेवणासाठी घरी आला होता. परंतु, यावेळी जेवणावरून सुभेदार आणि चांदणी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने दोघांमध्ये हमरी-तुमरीचा प्रकार घडला.
या वादातून चांदणी हिने सुभेदार याच्यावर चाकूने छातीवर हल्ला केला.
यावेळी बचावासाठी सुभेदार यानेदेखील पत्नी चांदणी हिच्या पायावर चाकूने हल्ला केला. परंतु चांदणी हिने रागाच्या भरात सुभेदार याच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. छातीवर चाकूचा वर्मी घाव बसल्याने सुभेदार रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. चांदणी हिने घटनास्थळावरुन पलायन केले. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
बेडग (ता. मिरज) येथे शेतीची वाटणी आणि चैनीसाठी पैसे देत नसल्याने रागाच्या भरात मुलानेच स्वत:च्या पित्याला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. दादू गणपती आकळे (वय 58) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा लक्ष्मण दादू आकळे (32, रा. उपार वस्ती, बेडग) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
बेडग येथील उपार-आकळे वस्तीवर दादू हे दुसरी पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होते. पहिल्या पत्नीचा मुलगा लक्ष्मणने काहीजणांकडून उसनवारीने 80 हजार घेतले होते. या पैशाची परतफेड करण्यासाठी लक्ष्मणने दादू यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. लक्ष्मण याने त्याच्या वाटणीची जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता; मात्र त्याच्या वडिलांनी त्यास पैसे अथवा जमिनीची वाटणी देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. वडिल पैसेही देत नाहीत, जमीनही नावावर करत नाहीत म्हणून लक्ष्मण चिडून होता. बुधवारी सकाळी दादू शेताजवळ सकाळी चालत निघाले होते. यावेळी लक्ष्मण हा त्या ठिकाणी आला. त्यांच्यात पुन्हा वादा झाला, यावेळी लक्ष्मणने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. ट्रॅक्टरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
किरकोळ कारणावरून आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनातील एका हॉटेलमधील सुरेश कलाप्पा कडेमनी (वय 40, रा. गोड्याळ, ता. इंडी, जि. विजापूर) या वेटरचा हॉटेल कामगाराने डोक्यात लाकडी ओंडका घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. संशयित प्रशांत उबे (वय 45, रा. हडपसर, माळीवाडी जि. पुणे) हा घटनेनंतर फरार झाला आहे.
सुरेश कडेमनी हे ढालगाव-नागज रस्त्यालगत आरेवाडीच्या बिरोबा बनात असलेल्या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसापासून वेटर म्हणून कामाला होते. दरम्यान, संशयित प्रशांत उबे हा दोन दिवसांपूर्वी याच हॉटेलमध्ये रोटी भाजण्यासाठी कामाला आला होता. मंगळवारी रात्री सुरेश व प्रशांत यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. सुरेश हा त्या रात्री हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये झोपला होता. बुधवारी पहाटे संशयित प्रशांत हा सुरेश झोपलेल्या पत्र्याच्या खोलीत आला व त्यांच्या डोक्यात लाकडी ओंडक्याने मारहाण केली.जखमी अवस्थेत त्याला प्रथम ढालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.