सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी | पुढारी

सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी पावसाने हजेरी लावली. काही भागांत मध्यम तर अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 6.8 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

कवठेमहाकांळ तालुक्यात सर्वाधिक 16.2 मि.मी. पाऊस पडला आहे.सांगलीत दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या दरम्यान ढगांची दाटी झाली. त्यानंतर मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

आरग ः मिरज तालुक्याच्या पूर्वभागातील आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडीसह परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये अशी ः मिरज 5.7, जत 15, खानापूर-विटा 9.1, वाळवा-इस्लामपूर 1.2, तासगाव 11.4, शिराळा 0.1, आटपाडी 10.9, कवठेमहांकाळ 16.2, कडेगाव 1.4.

चांदोली धरणात 19.71 टीएमसी पाणीसाठा आहे. विविध धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये पुढीलप्रमाणे ः कोयना 41.61, धोम 6.16, कन्हेर 4.48, अलमट्टी 91.00 टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, मका, तूर, उडीद अशा विविध पिकांची सुमारे 75 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. काही भागात आडसाली उसाची लागण सुरू आहेत. पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र अद्यापही समाधानकारण पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

वाळवा तालुक्यात पुनरागमन

इस्लामपूर ः वाळवा तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सूनचे पुनरागमन झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. रविवारी तालुक्यातील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. रविवारी सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तालुक्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त होता. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

इटकरे परिसरात पाऊस

इटकरे ः वाळवा तालुक्यातील इटकरे येथे रविवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे, ओघळींना पाणी आले होते. रविवारी झालेल्या पावसाचा इटकरे परिसरात जास्त जोर होता. आजूबाजूच्या गावातूनही चांगला पाऊस झाला.

Back to top button