गौरी गोसावी खून प्रकरण : आधी खोदला खड्डा…मग केला खून…पुरला मृतदेहही…पण… | पुढारी

गौरी गोसावी खून प्रकरण : आधी खोदला खड्डा...मग केला खून...पुरला मृतदेहही...पण...

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या रविवारी खडड्डा खोदला…सोमवारी खून केला…मृतदेह पुरलाही…पण मनाच्या बेचैनीचे काय करायचे ? झोप लागेना…त्याने पोलिस ठाणे गाठले आणि कबुली दिली. त्यामुळे खुनाला वाचा फुटली. येथील अहिल्यानगर-प्रकाशनगरमधील गौरी गोसावी या महिलेचा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या ताब्यातील त्यांचा पुतण्या निहाल गोसावी याने साथीदाराच्या मदतीने गौरी यांचा खून केल्याची कबुली दिली. निहालने खून करण्यापूर्वी रविवारी रात्रीच सलगरे (ता. मिरज) येथील गायरान भागातील जंगलात मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदल्याचे सांगितले.

अखेर गूढ उकलले

15 मे रोजी (सोमवार) सकाळी सात वाजता गौरी भंगार गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांना पतीने माधवनगर (ता. मिरज) येथे सोडले होते. तेथून त्या निघून गेल्या होत्या. त्यादिवशी त्या घरी परतल्या नाहीत. पतीने रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. 16 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता निहालने संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन कबुली दिली.

चारित्र्यावर संशय

गौरी या भंगार गोळा करण्यासाठी दररोज घराबाहेर जात होत्या. निहाल त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्याने गौरी यांच्याशी अनेकदा भांडण काढले होते. तो त्यांना भंगार गोळा करण्यासाठी जाऊ नका, असे सांगत होता. तरीही त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जात होत्या. त्यांच्या वर्तनामुळे कुटुंबाची बदनामी होते, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने त्यांचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्याने एक साथीदाराची मदत घेतली.

भंगारच्या बहाण्याने नेले!

निहालने सोमवारी सकाळपासून गौरी यांचा पाठलाग सुरू केला. पतीने त्यांना माधवनगरच्या बसस्थानकावर सोडल्याचे त्याने पाहिले होते. त्याचवेळी त्याने साथीदाराला बोलावून घेतले. छोटा हत्ती (टेम्पो) घेऊन त्याने गौरी यांना गाठले. सलगरे येथे म्हैसाळ पाणी योजनेच्या खराब इलेक्ट्रीक मोटारी खूप आहेत. त्या तुम्हाला भंगार म्हणून घेऊन देतो, असे म्हणून गाडीत बसण्यास सांगितले. गौरी गाडीत बसल्या.

थेट सलगरे गाठले!

निहाल व त्याच्या साथीदाराने गौरी यांना सलगरे येथे थेट जंगलात नेले. त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये त्या काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडून मरण पावल्या. जंगलाचा भाग असल्याने तिथे फारशी वर्दळ नसते. त्यामुळे मृतदेह त्यांनी पुरला.

निहाल झाला बेचैन

खून करून निहाल सायंकाळी घरी आला. गौरी यांची मुले आई अजून का आली नाही, असा विचार करीत दरवाजात बसून होती. गौरी घरी न आल्याने सर्वजण काळजीत होते. त्यादिवशी रात्री निहालला झोप लागलीच नाही. दुसर्‍यादिवशी सकाळपासून तर तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. गौरी यांचा खून केल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला होता.

अखेर पोलिस ठाण्यात हजर!

तो दुपारी साडेतीन वाजता पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने कबुली दिली. त्यानंतर गौरी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले. रात्री उशिरा मृतदेह हाती लागला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात विच्छेदन केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी अहवाल राखून ठेवला आहे. हा खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद आहे.

सहा दिवसांची पोलिस कोठडी

अटकेत असलेल्या निहाल गोसावी याला बुधवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत (सहा दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, निहाल पोलिसांना शरण गेल्याचे समजताच त्याचा साथीदार गायब झाला आहे. त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. मात्र तपासाच्याद्दष्टिने कवठेमहांकाळ पोलिसांनी कमालीची गोपनियता बाळगली आहे.

Back to top button