

सांगली; सचिन लाड : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 86 अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्या आहेत. सरासरी 48 तासाला एका मुलीचे अपहरण होत असल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे.16 ते 17 वयोगटातील या मुली असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. दोन-दिवसातून एखादा तरी कोणत्या तरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगी गायब होत असल्याची नोंद होत आहे. पालक माझ्या मुलीला कोणी तर फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार देतात. बहुतांश प्रकणात संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे या मुलींचा कसा आणि कुठे शोध घ्यायचा, असा पोलिसांनाही प्रश्न पडलाय. मुलींकडे मोबाईल आहेत. घरातून गायब होताच त्यांचे मोबाईल बंद लागतात. तांत्रिक पद्धतीने तपास करायचा म्हटले तरी ठोस धागा सापडत नसल्याने तपासालाही निश्चित दिशाही मिळत नाही.
गेल्या चार महिन्यांपासून मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिस दप्तरी झालेल्या नोंदीवरून दिसून येते. काही मुली प्रेमसंबंधातून पळून जात आहेत. मुलीच्या प्रेमसंबंधाची पालकांना माहिती मिळते. मुलींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही त्या प्रेमसंबंध तोडत नाही. घरचा विरोध आणि शारीरिक आकर्षण या गोष्टीही मुली पळून जाण्यास कारणीभूत आहेत. घराची प्रतिष्ठा जाईल, या भीतीने अनेक पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रारच दाखल केलेली नाही.
एकाच गावात मुला-मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजताच जाती-पातीचा विचार न करता त्यांच्या कुटुंबांनी एकत्रित येऊन त्यांचे लग्न लाऊन दिले आहे. मिरज तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात अशी 11 लग्ने झाली आहेत. मुला-मुलीने पळून जाऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, ही भूमिका ठेवून पालकांनी त्यांची लग्ने लावून दिली.
अल्पवयीन मुलगी पळून गेल्यानंतर ती सापडल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होते. पालकांकडून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षात अशा प्रकारच्या गुन्ह्यात घट झाल्याचे पोलिस दप्तरीतील नोंदीवरून दिसून येते. कायद्याचा अभ्यास करणारीही प्रेमीयुगुल जोडपी आहेत. प्रेमविवाह करण्यासाठी पळून गेल्यानंतर पुढे कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ते पूर्ण तयारीनिशी जातात.
ग्रामीण भागात अनेक मुली 16 व्या वर्षीच गर्भवती राहत असल्याचे काही प्रकरणे घडली आहेत. हा प्रकार उघडकीस येताच गुपचूपपणे तिचा गर्भपात करून लग्न लावून दिले जात आहे. घराची प्रतिष्ठा जाऊ नये, यासाठी याची कुठेची वाच्यता केली जात नाही. अशातूनच गेल्या चार वर्षांत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात 7 अल्पवयीन मुली प्रसूत झाल्या आहेत.
86 पैकी 23 मुली लग्नाच्या बेडीत अडकल्या. उर्वरित 63 मुली अजूनही गायब आहेत. त्या आहेत तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा तपास चार-आठ दिवस सुरू राहतो. तपासात मुलगी पळून गेल्याचे निष्पन्न होते. या मुली 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या लग्न करूनच येणार, असे आता पोलिसांनाही माहिती झाले आहे, कारण अशी अनेक प्रकरणे घडली आहेत.
गेल्या चार महिन्यात पळून गेलेल्यांपैकी 23 मुली लग्नाच्या बंधनात अडकल्या आहेत. 18 वर्षे पूर्ण व्हायला दीड-दोन महिने कमी असताना त्या पळून गेल्या होत्या. नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी त्यांनी आवश्यक ती कागदपत्रेही घरातून गुपचूप नेली होती. लग्न करून त्या पतीसोबत पोलिस ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांनी मुलीच्या पालकांना बोलावून घेतले. मुलगी लग्न करून आली आहे, तुमची काय तक्रार आहे का, असे विचारतात. मात्र पालक आमची काय तक्रार नाही, असे सांगतात.
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. जलदगतीने तपास व्हावा, यासाठी अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. स्थानिक पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तांत्रिक मुद्द्याच्या आधारेही तपास केला जात आहे.
– सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली.