चला पर्यटनाला : बुर्ली बंचाप्पा बनात पक्षी, प्राण्यांचा खजिना | पुढारी

चला पर्यटनाला : बुर्ली बंचाप्पा बनात पक्षी, प्राण्यांचा खजिना

पलूस; तुकाराम धायगुडे :  पलूस तालुक्यातील बुर्ली-आमणापूर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या बंचाप्पा बन परिसराचा पर्यटनवाढ तसेच पक्षी अभ्यास यादृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. या बनात मोरांचे अनेक कळप आहेत. शिकार्‍यांपासून त्यांच्या रक्षणासाठी वन विभागाकडून उपाययोजना गरजेची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण व पक्षी प्रेमींकडून याची मागणी होत आहे. परंतु वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

बुर्ली हद्दीत असलेले बंचाप्पा बन हे 80 एकरांचे गायरान आहे. बनात धनगर समाजाचे बंचाप्पा मंदिर आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. बनात तांबड्या मातीतील गाडीवाट आहे. त्याला फांद्यांप्रमाणे फुटलेल्या असंख्य पायवाटा आहेत. उत्तरेला उसाची हिरवीगार शेती, दक्षिणेला कृष्णामाई आहे. या बनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध पक्ष्यांची संख्या खूप मोठी आहे. याशिवाय चिंच, करंज यांची हात पसरून उंच झाडे, पावसाळ्यात तरवड हिरवीगार दिसतात. पावसाच्या सुरुवातीला मोरांचा विणीचा हंगाम असतो. साधारणपणे मे पासून ते जून अखेरीपर्यंत लांबलचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर दिसू लागतात. रुबाबदार देखणा मोर, त्याचे बहुरंग, नृत्य पाहायला मिळणे फारच दुर्मीळ; पण या बनात मन मोहून टाकणारे हे द़ृश्य सहज दृष्टीस पडते.
या ठिकाणी पक्ष्यांची संख्या मोठी आहे. यात मोर, पोपट, मनोली, सुगरण, चिमणी, नाचण, बुलबूल, कावळा, मालकोवा, सोनपाठी सुतार, सुतार, चातक, स्वर्गीय नर्तक, मोहोळ घार, तांबट, रक्तलोचन घुबड, रातवा अशा देशी-विदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन सहजच घडते. पक्ष्यांना खाद्य म्हणून सिकाडा, मुंग्या, सुरवंट, वाणीकिडा, तुडतुडे अशा असंख्य कीटकांची गर्दी पाहायला मिळते. धामण, घोणस, नाग आढळतात. बनाच्या ईशान्य बाजूच्या ओतात अनेक दुर्मीळ पाणपक्ष्यांची नोंद झाली आहे. यामध्ये लावा फटागडी, तांबूस फटागडी, काळी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी, लाजरी पाणकोंबडी, बोरूचा वटवट्या या पक्ष्यांचा समावेश आहे. बंचाप्पा बनाच्या परिसरात पूर्वी घनदाट बाभूळ झाडी होती. परंतु, आता वनविभागाच्या दुर्लक्षतेने बरीच वृक्षतोड झाल्याचे दिसते. 2019 च्या महापुरात झाडांची पडझड झाली आहे.

वृक्षतोडीने घुबड, स्वर्गीय नर्तकाचे दर्शन दुर्मिळ

ओढ्याच्या वळणावर ओताच्या सुरुवातीला एक विशाल पर्जन्यवृक्ष (रेन ट्री ) होता. दुर्मीळ असे रक्तलोचन घुबडाचे कुटुंब, स्वर्गीय नर्तक, राखी धनेश, निखार, चश्मेवाला या पक्षांबरोबरच अनेक मोर, लांडोर यांचा नेहमीच त्यावर विसावा असायचा. या झाडाच्या फांद्याच्या खोबणीत अनेक पक्ष्यांचे वास्तव्य होते. तब्बल सहा फूट रुंदीचा बुंधा असणारा हा वृक्ष काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी जमीनदोस्त केला. अधिवास नाहिसा झाल्यामुळे या परिसरात घुबड, स्वर्गीय नर्तक यांचे दर्शन झाले नाही.

बंचाप्पा बन पर्यटन स्थळ करणार ?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंचाप्पा मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 3 कोटी मंजूर केले होते. परंतु शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. सरकारकडे पाठपुरावा करून ती स्थगिती उठवली आहे. लवकरच 3 कोटी जमा होतील. जिल्ह्यात बंचाप्पा बन पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार, असे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.

Back to top button