सांगली : नागेवाडीला 4.20, वाळेखिंडीत 3.36 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प सुरू | पुढारी

सांगली : नागेवाडीला 4.20, वाळेखिंडीत 3.36 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प सुरू

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचे 7.56 मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तासगाव तालुक्यातील नागेवाडी व जत तालुक्यातील वाळेखिंडीतील आठ गावांतील 2200 शेतकर्‍यांना दिवसा व कमी दरात वीज मिळणार आहे.

रात्री सिंचन करताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा, यासाठी सरकारने 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. याव्दारे 7.56 मेगावॅटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प नुकतेच सुरू केले.
यामध्ये तासगाव तालुक्यातील नागेवाडीत 4.2 मेगावॅट प्रकल्प सुरू केला. यातून नागेवाडी, अंजनी, वडगाव आणि लोकरेवाडीतील सुमारे 1200 ते 1300 शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. हा प्रकल्प महावितरणच्या 33/11 के. व्ही. अंजनी-नागेवाडी उपकेंद्राला जोडला आहे. सुमारे 10 हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभा केला आहे. प्रकल्पास 15 कोटी खर्च झाला.

याबरोबरच जत तालुक्यातील वाळेखिंडीत 3.36 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. याव्दारे वाळेखिंडी, बेवनूर, सिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे 8 हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभा केला आहे. प्रकल्प उभारणीस 12 कोटी खर्च झाले. या दोन प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी 10 ते 15 व्यक्तींना रोजगार मिळाला. यातून 3.30 रुपये प्रती युनिट दराने वीज मिळणार आहे.

आणखी तीन प्रकल्प अंतिम टप्प्यात

तसेच आगामी काही महिन्यात महानिर्मितीचे सांगली जिल्ह्यातील बोर्गी येथे 2 मेगावॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे 4.4 मेगावॅट, सातारा जिल्ह्यातील सोनगाव येथे 4.2 मेगावॅटच्या प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Back to top button