सांगली : दहा मिनिटात घरी पोहोचणार होते पण.... | पुढारी

सांगली : दहा मिनिटात घरी पोहोचणार होते पण....

जत; विजय रुपनूर :  वेळ रात्री 10.45 ची. वार शुक्रवार. नियतीच्या मनात वेगळच काही सुरू असावे. अन् सावंत कुटुंबीय देवदर्शनाहून घरी दहा मिनिटाच्या अवधीतच परतणार होते. तेवढ्यात त्यांची कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. सावंत कुटुंबियांची जीवनयात्रा संपली.

या अपघातात कार शंभर फूट फरपटत गेली. तर ट्रक महामार्गावरून खाली कोसळला. रस्त्यालगतचा डंपरही रस्त्याच्या खाली कोसळला. सुरुवातीस घटनेचे गांभीर्य कोणाच्याही लक्षात आले नव्हते. परंतु महामार्गाच्या खाली कोसळलेल्या कारमध्ये जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. दृश्य मन हेलावून टाकत होते. याच अपघातात बनाळी येथील सावंत कुटुंबातील आजी, आजोबा, सून, नातू असे ठार झाले. या घटनेने बनाळीसह संपूर्ण जत तालुका हादरला. या महामार्गावरून जाणार्‍या एका व्यक्तीने 112 नंबर डायल करून मदत मागितली. त्यामुळे पोलिस घटनास्थळी काही मिनिटातच दाखल झाले. अपघातातील व्यक्तींना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु चौघेही ठार झाले. कार चालक चव्हाण मृत्यूशी झुंज देत होता. तेही प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर चव्हाण यांची प्राणज्योत मालवली.

आकाशदीप सावंत यांचा हंबरडा

दरम्यान, रात्री उशिरा पाच मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले. सावंत कुटुंबातील ठार झालेल्या नामदेव सावंत, पद्मिनी सावंत, मयुरी आकाशदीप सावंत व श्लोक सावंत यांचे पार्थिव मूळगावी बनाळी येथे आणण्यात आले. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान नातेवाईकांचा हंबरडा हळहळायला लावणारा होता. कोवळ्या वयातच आठ वर्षीय श्लोकने जगाचा निरोप घेतला. आई, वडील व पत्नी यांच्या निधनाने आकाशदीप नामदेव सावंत (वय 45) हे दुःखद प्रसंगाला सामोरे जात आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे दळणवळणाच्या सोयी- सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तालुक्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. महामार्गावर अपघात वारंवार होत आहेत. विजयपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर धावडवाडी-कुंभारी ते मुचंडी दरम्यान वर्षभरात झालेल्या अपघातात 14 जणांचे प्राण गेले. यात वेगमर्यादाचे उल्लंघन, चुकीच्या पद्धतीने बेदरकारपणे वाहन चालवणे या बाबी अपघातास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. रस्ते प्राधिकरण विभाग दिशादर्शक फलक, मर्यादा फलक, रोड बॅरिकेटर्स या उपाययोजना केलेल्या नाहीत.

Back to top button