सांगलीचे आराध्य दैवत गणपतीचे मंदिर | पुढारी

सांगलीचे आराध्य दैवत गणपतीचे मंदिर

सांगली; नंदू गुरव : सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणपती मंदिराला २०२० साली चैत्र शुद्ध दशमीला १७५ वर्षे पूर्ण झाली. पाऊणशे वर्षांनंतरही सांगलीचे गणपती मंदिर सांगलीच्या सौंदर्यात भर टाकते. ते भक्तांना आधार देत उभे आहे. अगदी प्राचीन वास्तुचे रूप असलेले मंदिर आता अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि सजावटींनी आणखी सुंदर झाले आहे.

सांगलीच्या गणपती मंदिराचा इतिहास दोनशे वर्षांहूनही पुरातन आहे. तत्कालीन संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीत नवी राजधानी करण्याचे ठरवले आणि गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यासोबत आराध्य दैवत गणपतीचे मंदिरही बांधण्याचा संकल्प केला. १८११ मध्ये कृष्णाकाठावर गणेश मंदिराचे बांधकाम सुरू झाले. १८१४ मध्ये पायाभरणी झाली. ३० वर्षांनंतर काम पूर्ण होऊन भव्य आणि आकर्षक गणपती मंदिर साकारले.

मंदिराच्या बांधकामासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा आणि जोतिबाच्या डोंगरातून काळा पाषाण आणला गेला. अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले आणि त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती बनविल्या.   भीमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांनी त्या घडवल्या. १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा-अर्चा विधी झाला. यानंतर दोन वर्षांनी मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले आणि १८४७ मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मंदिरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या चार व एक मुख्य मंदिर असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.

विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखालील गणपती पंचायत ट्रस्टचे कामकाज चालते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून कायापालट केला. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले असले तरी मंदिराची मूळची सजावट कायम ठेवली आहे. कारंजे बसवण्यात आले. सभागृह बांधण्यात आले. बागबगीचा फुलवण्यात आला.

शाही गणेशोत्सव

दरवर्षी भाद्रपदमध्ये पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशदुर्गातील दरबार हॉलमध्येही गणेशाची स्थापना करण्यात येते. ही प्रथा २०० वर्षांपासून जपली आहे. या गणेशोत्सवालाही शाही रूप देण्यात आले आहे. उत्सवासाठी शाही परिवार अगत्याने उपस्थित असतो. अगदी चित्रपट तारका भाग्यश्री पटवर्धनही या उत्सवाला आवर्जून हजेरी लावून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते. या मिरवणुकीत अग्रभागी असणारा लाडका बबलू हत्ती मात्र आता दिसत नाही.

Back to top button