चला पर्यटनाला : पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर | पुढारी

चला पर्यटनाला : पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

सांगली; नंदू गुरव : ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन, निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून, झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर…

कधीकाळी बालकवींनी केलेले हे वर्णन आजही तसेच ताजतवाने आणि हिरवंगार आहे. कृष्णेच्या काठावरचे औदुंबर अगदी निसर्गाला एखादे हिरवे स्वप्न पडावे असे आहे. हिरवाई जपत औदुंबरमध्ये काही आधुनिक सोयीसुविधा झाल्या आहेत. त्याचा लाभ पुण्या- मुंबईसारख्या धकाधकीच्या महानगरांमधून एक दोन दिवस औदुंबरी येऊन शांत होणार्‍या भक्तगणांना होतो आहे.

औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडं आहेत. गाव तसं लहान, पण त्याचा महिमा मोठा. श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांनी 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केलं, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप गाव आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी मंदिर. दाट झाडी, कृष्णेचे तुडुंब भरलेले पात्र आणि एकांत यामुळं औदुंबरी तपोवनाची प्रचिती येते.

औदुंबरचा घाट तर भला मोठा प्रशस्त आहे. हा घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून मदत घेऊन विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधला. पण आजही तो जसाच्या तसा आहे. घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते. मार्गशीर्ष शुद्ध 15 श्री दत्तजयंती, दत्तजन्मोत्सव व महाप्रसाद होतो. माघ शुद्ध एकपासून श्रीं नृसिहसरस्वती निर्वाण महोत्सव होतो. माघ वाद्य 5 या दिवशी गुरुपादुकाची महापूजा होते. त्या दिवशी गावातून पालखी मिरवणूक निघते. मकरसंक्रांतीला सदानंद साहित्य मंडळाचे साहित्य संमेलन होते. पावसाळ्यात मात्र मंदिर महापुराच्या पाण्याखाली जाते. श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरात बुडून जातात आणि त्यामुळं नित्योपासना, दर्शन अशक्य होऊन बसतं.

काय पाहाल…

गुरू शिवशंकर आश्रम, ब्रह्मानंद मठ,
कृष्णेचा डोह, भुवनेश्वरी मंदिर.

जाल कसे? 

पुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्करवाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी औदुंबर हे ठिकाण आहे. सांगलीपासून ते 25 किलोमीटरवर आहे. बसने, खासगी वाहनांनी थेट औदुंबरला पोहोचता येते. तेथे राहण्या-जेवणाची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत.

Back to top button