सावधान…’नो मोबाईल फोबिया’ वाढतोय, लक्षणे कसे ओळखाल? | पुढारी

सावधान...'नो मोबाईल फोबिया' वाढतोय, लक्षणे कसे ओळखाल?

सांगली; गणेश मानस :  रिया… सोळा वर्षांची. अचानक पहाटे तिला जाग आली… झोपेतच तिने हात उशीजवळ नेला, पण नेहमीची वस्तू तिला सापडली नाही. तिची आवडती वस्तू म्हणजे ‘मोबाईल’ त्या ठिकाणी नव्हती… ती अस्वस्थ झाली… ‘रागाने’ तिने आईला, बहिणीला मोठमोठ्याने हाक मारण्यास सुरुवात केली. त्यांनीही ‘मोबाईल’ पाहिला नव्हता. तशी जास्तच बिथरली. तिला दरदरून घाम फुटला, तसा रागाचा पारा चढला… तिला भीतीही वाटू लागली. काही वेळाने तिला रडू कोसळले… अचानक तिला आतील खोलीतून मोबाईलची रिंग ऐकू आली. तशी ती पळतच खोलीत गेली, पण त्या ठिकाणी मोबाईल नव्हता… पण तिला आवाजाचा भास होत होता. शेवटी तिच्या शाळेच्या दप्तरात तिचा मोबाईल सापडला तसा तिचा जीव भांड्यात पडला आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग केला, पण मोबाईल कसा वापरावा याची कोणतीही शास्त्रीय माहिती मुलांना न दिल्यामुळे सध्या लाखो किशोरवयीन मुले ‘नोमोफोबिया’ (नो-मोबाईल फोबिया’)  या मानसिक आजारामध्ये अडकलेली आहेत. मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आणि महिन्याला अडीचशे ते तीनशे रुपयांना मिळणारा दीड जीबी डाटा यामुळे किशोरवयीन मुले या मोबाईलच्या व्यसनात अडकलेली आहेत.

लैंगिक आकर्षण

फेसबुक इन्स्टाग्राममुळे दररोज हजारो ‘रिल्स’ मुलांच्या मेंदूवर येऊन आदळत आहेत. त्यामध्ये बहुसंख्य रिल्स या प्रेम, सेक्स, ब्रेकअप यावर आधारित गाणी, शायरी, जोक्स असतात. त्यामुळे मुले यामध्ये तासन्तास अडकली जात आहेत. त्यानंतर पायरी म्हणजे प्रेम आणि सेक्स प्रत्यक्ष करून पाहण्यासाठी मुलांची धडपड सुरू होते.. याचा परिणाम म्हणून आठवी, नववीची मुले, मुली प्रेमात पडत असल्याचा सर्व्हे सांगतो. वास्तविक पाहता हे प्रेम नसून मोबाईलमुळे निर्माण झालेले ‘आकर्षण’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सर्वेक्षणचा धक्कादायक निष्कर्ष

मोबाईल मुलांच्या हाती आल्यानंतर काय पहावे, काय नाही, याचे ताळतंत्र राहिले नाही. इस्लामपूर येथील शुश्रूषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने कोविडनंतर मोबाईलमुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला, हे पाहण्यासाठी ७४४२ किशोरवयीन मुलां-मुलींचे मानसशास्त्रीय अभ्यास व सर्वेक्षण केले. त्यामध्ये ४८ टक्के मुलांमध्ये तीव्र स्वरूपाचे मोबाईल व्यसन जडल्याचे चित्र समोर आले. ६८ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये राग आणि संताप, ५८ टक्के मुलांमध्ये भूकेच्या तक्रारी, ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलपणा दिसून आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मानसतज्ज्ञ डॉ. कालिदास पाटील यांनी दिली.

नो-मो-फोबियाची लक्षणे कसे ओळखाल?

मुलांना मोबाईलचे व्यसन लागले तर काही लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये भीती वाटणे, वारंवार रडणे, कमी झोप, मुलांमध्ये न मिसळणे, अंथरुण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, अकारण डोके व पोटदुखी तसेच चिडचिडेपणा, अतिचंचलता, राग व अतिसंताप, एकाग्रतेचा अभाव, लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक समस्या दिसून येतात. मोबाईलचे चार्जिंग संपले की अस्वस्थता निर्माण होणे, रिंग वाजल्याचा भास होणे. ‘शुश्रुषा संस्थेने मोफत गुगल अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे पालकांची व मुलांची चाचणी घेऊन त्यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन केले जाते.

यावर उपाय ‘मोबाईल लिटरसी’

डॉ. कालिदास पाटील म्हणाले, मुलांकडून होणारा मोबाईलचा वापर आता पालकांच्या हाताबाहेर गेलेला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना यातून बाहेर काढता येऊ शकते. पालकांनी कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका घेऊन मुलांकडून मोबाईल काढून घेऊ नये. मोबाईलच्या योग्य वापराबाबत जागृती करणे आवश्यक आहे. ‘मोबाईल लिटरसी’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात आणला पाहिजे. लैंगिक शिक्षण हे तज्ज्ञांच्या माध्यमातून शाळेतूनच दिले पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्याचा वापर झाला पाहिजे.

Back to top button