सांगली : करेक्ट कार्यक्रम थांबला अन् महाविकास आघाडीने मारली बाजी | पुढारी

सांगली : करेक्ट कार्यक्रम थांबला अन् महाविकास आघाडीने मारली बाजी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीप्रमाणे जेजीपीचा (जयंत जनता पार्टी) करेक्ट कार्यक्रमाचा प्रयोग झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील अपवाद वगळता बहुतेक नेते एकसंध राहिले. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी चांगली मते मिळवत बाजी मारली. दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांत असलेले अंतर्गत वाद. त्यांच्यातील कुरघोड्या, अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीची न मिळालेली साथ याचा फटका त्यांच्या पॅनेलला बसला. त्यामुळे भाजप पॅनेलच्या उमेदवारांचा निवडणुकीत धुव्वा उडाला.

महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण अनेक वर्षे वर्चस्व राहिलेल्या दादा गटाच्या वाट्याला कमी जागा आल्या. दोन्ही पॅनेलमधील नेत्यांनी निष्ठावान, नातेवाईक उमेदवार निवडले. पॅनेल जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी अवघे चार दिवस होते. या काळात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाला. जिल्हा बँकेप्रमाणे या निवडणुकीतही जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादींकडून आपणला मदत होईल, असे भाजपच्या काही उमेदवारांना वाटत होते. जेजीपीचा करेक्ट कार्यक्रम होऊन क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात होईल. कोणत्याही एका पॅनेलची सत्ता येणार नाही. दोन्ही पॅनेलमधील उमेदवार निवडून येतील, अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते विशाल पाटील, आ. विक्रम सावंत खास काळजी घेत होते. परिणामी त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. चुरशीची होणार अशी वाटणारी निवडणूक एकतर्फी झाली. भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला.

जेजीपीचा करेक्ट कार्यक्रम का थांबला याची आता चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. गेल्यावेळी सांगली लोकसभेला काँग्रेसची उमेदवारी काढून घेऊन ती स्वाभिमानीला ऐनवेळी देण्यात आली. आता या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचे चिंरजीव प्रतीक यांना सांगली लोकसभेला उतरवण्या संदर्भात चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. लोकसभेला भाजपचा विरोधी उमेदवार असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीत गंमतीजमती करण्याऐवजी महाविकास आघाडी एकसंध कशी राहील यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा बाजार समिती निवडणुकीत झाला आणि महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला.

काँग्रेस तहात आणि युद्धातही जिंकली

सांगली बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलमध्ये चर्चा करताना काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा मिळाल्या. प्रत्यक्ष मतदानात काय होणार, याची उत्सुकता होती. काही उमेदवार अडचणीत असल्याची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडी पॅनेलमध्ये जास्त जागा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीतही त्यांच्या जागा जास्त आल्या आहेत.

तरी सोयीस्कर मतदान

समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून जोरदार रसद लावण्यात आली. त्यामुळे विजय आमचाच होणार, असा दावा दोन्ही पॅनेलचे नेते करीत होते. प्रत्यक्षात मतदारांनी सोयीस्कर मतदान केले. त्यामुळे भाजप पॅनेलचा धुव्वा उडाला.

भ्रष्टाचाराचा मुद्दा दुर्लक्षित

बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात पुढे आले आहे. या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी विशेषत: पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रचारात आवाज उठवला. मात्र, त्याचा निवडणुकीत फारसा प्रभाव दिसून आला नाही.

Back to top button