सांगली: विटा बाजार समितीवर काँग्रेस, शिंदे गट, भाजपची सत्ता कायम | पुढारी

सांगली: विटा बाजार समितीवर काँग्रेस, शिंदे गट, भाजपची सत्ता कायम

विटा : पुढारी वृत्तसेवा : विटा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेस, शिंदे गट आणि भाजप महायुतीने सत्ता कायम ठेवली. तर राष्ट्रवादीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. महायुतीने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या. लीलाताई देशचौगुले प्राथमिक विद्या मंदिरच्या सभागृहात आज (दि. २९) मतमोजणी झाली.

विटा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, शिंदे गट आणि भाजप महायुतीच्या शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली. या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी १७ जागांसाठी निवडणूक झाली. सत्ताधारी गटाने हमाल आणि तोलाई गटातील एक जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकली आहे. प्रत्यक्ष मतदानात खानापूर आणि कडेगाव तालुक्यात एकूण ९१.३० टक्के मतदान झाले होते.

सकाळी पावणे बाराच्या दरम्यान पहिला निकाल अनुसूचित जाती,जमाती या प्रवर्गातील आला. यात सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवाराने ५०० हून अधिक मतांनी बाजी मारत विजयाचे खाते उघडले. त्यानंतर महिला गटातील निकाल आले. सोसायटी विभागांमध्ये सर्वाधिक ११ जागा होत्या. यातील काही मतपत्रिकेत क्रॉस वोटिंग असल्यामुळे मतमोजणीला काही अंशी वेळ लागला. अखेरीस सोसायटी गटातील सर्व ११ जागांवर सत्ताधारी पॅनेलने मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. सत्ताधारी गटातील उमेदवारांना ९६५ ते ८०० च्या दरम्यान मते मिळाली. तर विरोधी गटातील उमेदवारांना २३३ च्या दरम्यान मते मिळाली.

निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र नगरसेवक अमोल बाबर, खानापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, प्रकाश बागल यांच्या उपस्थितीत गुलाल उधळत, फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते कंसात अशी –

कृषी पतसंस्था व बहुद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदारसंघ सर्वसाधारण गट : अविनाश जाधव (९६५), सुनिल जगदाळे (९६२), रामचंद्र जाधव (९२६), मारुती पाटील (९५४), सुरेश पाटील (९५३), शरद मोरे (८७७), जगन्नाथ सुर्वे (८८२)

कृषी पतसंस्था व बहुद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदारसंघ महिला राखीव गट :
सिंधूताई मोहिते (९९९), सुनंदा हणमर (१०१०)

कृषी पतसंस्था व बहुद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग राखीव गट : फिरोज शेख (१०२३)

कृषी पतसंस्था व बहुद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासप्रवर्ग राखीव गट : विजय होनमाने (१०३०)

ग्रामपंचायत शेतकरी मतदारसंघ सर्वसाधारण गट : विश्वनाथ काटकर (७४३), शिवाजी पाटील (६८५)

ग्रामपंचायत शेतकरी संघ अनुसूचित जाती/जमाती राखीव गट: रमेश मिसाळ (७६४)

ग्रामपंचायत शेतकरी संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक राखीव गट : भगवान नालगे (७४६)

अडते व व्यापारी मतदारसंघ गट: महेंद्र कदम (३३८), अनिल हराळे (२८७)

हमाल व तोलाईदार मतदारसंघ : संतोष कदम (बिनविरोध)

विरोधकांकडे बाजार समितीच्या विकासाची कोणतीही दूरदृष्टी नव्हती. त्यांनी केवळ आपला गट टिकविण्यासाठी निवडणूक लादली होती. मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखविली आहे. यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने बाजार समितीचा पारदर्शक कारभार केला जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

अनिल बाबर, आमदार शिवसेना

विटा बाजार समितीच्या एकूण मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसकडे ६००, राष्ट्रवादीकडे ३००, भाजपकडे १७०, तर शिवसेनेकडे साधारणपणे ३२५ अशी मतांची संख्या होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढली असती तर ९०० मते मिळाली असती. परंतु काँग्रेसने आम्हाला चर्चेत ठेवत ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रचाराला वेळ कमी पडला. आमच्या अपेक्षेपेक्षा मते जास्त मिळाली. मात्र, या निकालाचा परिणाम पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येईल.

बाबासाहेब मुळीक, प्रमुख  विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनल

हेही वाचा 

Back to top button