शरद पवार राजकीय भूकंप करणार नाहीत : नारायण राणे

शरद पवार राजकीय भूकंप करणार नाहीत : नारायण राणे
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शरद पवार राजकीय भूकंप करणार नाहीत. राजकीय भूकंप होण्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती नाही. महाराष्ट्राचे सरकार भक्कम आहे, असे भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. अजित पवार यांच्या मनात काय चालले आहे माहिती नाही. त्यांना भाजपमध्ये घ्यायचे किंवा नाही, हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार भक्कम आहे. ते चांगल्याप्रकारे चालले आहे. ते कार्यकाळ पूर्ण करेल. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाचे 190 आमदार निवडून येतील. लोकसभा निवडणुकीत भाजपचे 46 उमेदवार निवडून येतील. लोकसभेला सांगलीचा भाजपचा खासदार निवडून येईल. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाऊ. लोकसभेच्या आगामी निवडणूक भाजप देशात 402 जागा जिंकेल. माझ्याकडे दक्षिण गोवा, दक्षिण मुंबई आणि सांगली लोकसभेची जबाबदारी आहे. सांगलीचा खासदार प्रचंड मतांनी विजयी होईल. जिल्ह्यात भाजप एकसंघपणे निवडणुकीला सामारे जाईल. नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय, विविध योजना, कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. जागतिक अर्थसत्तेत भारत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. 2030 पर्यंत भारत महासत्ता बनेल. मोदी हे तिसर्‍यांदा प्रधानमंत्री होतील. राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 46 जागा भाजप जिंकेल.

ते म्हणाले, अजित पवार यांच्याशी काही महिन्यांपासून भेट झालेली नाही. दूरध्वनीही झाला नाही. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वरिष्ठ नेते बघतील.

राऊत, ठाकरे … तळ गाठला आहे.

भांडूपच्या सभेतील वक्तव्याविरोधात राऊत यांनी मुलुंड न्यायालयात राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यासंदर्भातील प्रश्नावर राणे म्हणाले, कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. प्रतिष्ठित माणसाचे नाव घ्या. संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट आणि मातोश्री हा विषय आता बंद करा. त्यात आता काय राहिले नाही. त्यांनी तळ गाठला आहे. त्यांना आता महाराष्ट्रात परत सत्ता मिळणार नाही.

ड्रायपोर्ट रांजणी किंवा सलगरेला

खासदार संजय पाटील म्हणाले, ड्रायपोर्ट कोठेही जाणार नाही. जिल्ह्यात निश्चितपणे होईल. रांजणी येथील जागेचा प्रस्ताव आहे. सलगरे येथे गायरान जागा उपलब्ध आहे. रांजणी किंवा सलगरे या दोन्हीपैकी एका ठिकाणी ड्रायपोर्ट निश्चितपणे होईल.

ड्रायपोर्ट, एअरपोर्टसाठी प्रयत्न

नारायण राणे म्हणाले, सांगली जिल्ह्यात ड्रायपार्ट तसेच विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणे तसेच उपउत्पादने निर्यात करण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे. सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग जिल्ह्यात आणणे, उद्योग क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न करणार आहे. जत तालुक्यातील तम्मनगौडा रवि-पाटील या युवकाच्या 38 कोटींच्या उद्योग क्लस्टरला मंजुरी दिली आहे. अनेक उद्योग जिल्ह्याला देण्याचा मानस आहे. दोन महिन्यांनी मी स्वत: अधिकार्‍यांना घेऊन सांगलीला येणार आहे. सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग सुरू करणे, मशिनरी, प्रशिक्षण, आर्थिक मदत केली जाईल. कुपवाड एमआयडीसीतील अडचणी सोडवल्या जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news