

इस्लामपूर : संदीप माने
इस्लामपूर येथे 1972 साली दुष्काळग्रस्तांच्या मोर्चावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये सुरेशकुमार पाटील, राजेंद्र पाटील, रंगा गायकवाड, दिलीप निलाखे हे तरुण हुतात्मा झाले होते. या घटनेला आज, शनिवारी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. इतिहासातील काळा दिवस म्हणून ही घटना गणली जाते. 1972 साली दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी कष्टकरी वर्गाच्या हालअपेष्टा सुरू होत्या. जनावरे तडफडत होती. खरीप करपून गेला होता. विहिरी आटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने 19 ऑक्टोबर 1972 रोजी इस्लामपूर तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. एन. डी. पाटील यांनी केले होते.
वाळवा तालुका दुष्काळी भाग म्हणून जाहीर करा, मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे, दुष्काळग्रस्त मजुरांना किमान रोज चार रुपये मजुरी मिळाली पाहिजे, दुष्काळी कामावरील मजुरांना कामासाठी सरकारी साधने मिळावीत, समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे, पगार आठवड्याला पाहिजे, खुजगाव धरण झाले पाहिजे, इस्लामपूरचा खडी तलाव, हत्ती तलाव, इतर लहान-मोठे तलाव व नागठाणे बंधारा यासारखी कामे ताबडतोब सुरू करावीत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खाली आणाव्यात, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दरमहा पन्नास रुपये भोजन भत्ता मिळावा, परीक्षेची फी सरकारने भरावी, दरमहा 12 किलो धान्य मिळावे, या मागण्या होत्या.
तहसील कचेरीच्या चारही बाजूच्या रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती. एन. डी. पाटील मोर्चाला उद्देशून बोलत होते. अचानक एसआरपी, पोलिसांनी ए. एन. पाटील यांच्यावर लाठीमार केला. त्यांना ढकलत कचेरीकडे नेले. इकडे मोर्चावरही लाठीमार सुरू होता. लोक वाट दिसेल तिकडे आश्रयाला धावत होते. अश्रुधुराची नळकांडी फोडली होती. त्यामुळे लोकांच्या डोळ्यात चटणी टाकल्याप्रमाणे झणझणत होते. मोर्चा आवरेना म्हटल्यावर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात राजेंद्र पाटील (शिगाव), सुरेशकुमार पाटील (ढवळी), रंगा गायकवाड (जक्राईवाडी), दिलीप निलाखे (इस्लामपूर) हे 16-17 वर्षाचे तरुण शहीद झाले. या घटनेला आज 52 वर्षे होत आहेत. चौघांच्या बलिदानाची आठवण म्हणून येथील तहसील कार्यालयाच्या चौकात स्मृती स्तंभ उभारला जावा, अशी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. - नितीन बारवडे, शिगाव