जत : उमदी जवळील अपघातात एक जण ठार, दोघे जखमी | पुढारी

जत : उमदी जवळील अपघातात एक जण ठार, दोघे जखमी

जत :पुढारी वृत्तसेवा

उमदी (ता. जत) येथे कोडग वस्तीजवळ दोन मोटरसायकल स्वरांना वेगाने जाणाऱ्या बोलोरा गाडीने धडक दिल्याने एक ठार झाला आहे व दोघेजण जखमी झाले आहेत. विराज विनायक कोडग (वय. ९ ) (रा.उमदी ) हा अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.शिवाजी लक्ष्मण कोडग व स्नेहल शिवाजी कोडग हे दोघेजण अपघातात जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेजबाबदार निष्काळजीपणे भरधाव गाडी चालविल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलोरो चालक महादेव शिवाप्पा लोणी (रा. उमदी) यांच्यावर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विनायक ज्ञानदेव कोडग यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक कोडग उमदीतून मोटरसायकलवरून घराकडे जात होते. यावेळी त्यांच्या गाडीवर मुलगा विराज होता. त्यांच्याबरोबर दुसऱ्या मोटरसायकलीवर चुलत भाऊ शिवाजी लक्ष्मण कोडग व स्नेहल शिवाजी कोडग होते. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन्ही मोटरसायकली कोडग वस्ती जवळच्या गतिरोधक जवळ आल्या होत्या. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने बोलोरा गाडी क्रमांक एम .एच. १०: बी .एम. ५९८१ या गाडीने धडक दिली . बोलोरा गाडी चालक महादेव लोणी यांचे गाडीच्या वेगावर नियंत्रण नव्हते .यामुळे बोलोरा ने दोन्ही मोटारसायकला धडक दिली.यातील चौघेही खाली पडले. यातील विराज कोडग यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती व शिवाजी कोडग व स्नेहल ही जखमी झाले .विराज ला गंभीर दुखापत झाल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी नेले होते. यावेळी त्यांनी सांगली येथे उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले . तत्पूर्वी विराजचा वाटेतच मृत्यू झाला होता.अधिक तपास उमदी पोलीस करत आहे.

Back to top button