सांगली : ‘मर्दानगी’ नसबंदीच्या रुळावर; शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचा पुढाकार

सांगली : ‘मर्दानगी’ नसबंदीच्या रुळावर; शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचा पुढाकार
Published on
Updated on

सांगली; संजय खंबाळे :  स्थळ : जिल्ह्यातील एक गाव… कट्ट्यावर काहीजण गप्पा मारत बसेलत… एकजण तालुक्याच्या ठिकाणाहून येत आहे… अचानक एकाचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि संवाद सुरू होतो…
'अरं ए राम्या, कुठं गेला हुतास. आम्ही ऐकलयं ते खरं हाय काय?
तसा तो म्हणतो, ' काय ऐकलय रे माझ्याबद्दल', अरं मरदाच्या तुझं ते ऑपरेशन झालंय असं कळलं. आता तुझ्या 'कामा'च कसं हुणार. लेका तुझ्या 'मर्द'पणाचं कसं हुणार?'
तसा तो म्हणाला, 'अरं शाम्या, अजून तू जुन्या जमान्यातच राहतुस गड्या. ऑपरेशन केल्यानं आपला 'मर्दपणा' काही जात नाय, आणि आपल्या कोणत्याच 'कामा'त अडचण बी येत नाही, असं मला आता कळलयं, फकस्त पाळणा तेवढा लांबणीवर पडतो बघं. म्हणजे आपणही सुखी आणि आपली पोरंबी सुखी. याला बरं का, यालाच खरा मर्द म्हणत्यात बघ. नाहीतर तुम्ही अजून चुकीच्या गैरसमजातच अडकून बसलायं" मी तर खरा मर्दगडी निघालो, तुम्हीबी बनाकी खरा 'मर्द'. तसा राम्या चाचपडलाच. तो म्हणाला, अरं शाम्या तूच खरा मर्द निघालास बघं. आता आम्हीबी जातो तालुक्याच्या ठिकाणी आनं लगेच ऑपरेशन करून टाकतो, अन् मीबी खरा मर्दगडी बनतो बघं", "आता कसं, बाईनं कुकवाला आणि मर्दानं ऑपरेशनला नगं म्हणूनी' आता आपण संमदीजण आपल्या गावालाच मर्द बनवू की" "आता कसं, चल निघतो मी"

तर मंडळी तुम्ही राम्या, अन् शाम्याचा संवाद ऐकलाना. आता संवाद आपल्या सांगली जिल्ह्यात सुरू आहे. त्याच कारण म्हणजे पुरुष नसबंदीचा टक्का जिल्ह्यात वाढतो आहे. गेल्या सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पुरुष नसबंदीमध्ये जिल्ह्याने आघाडीने घेतली आहे. कधी शून्य, तर कधी दोन, तर आठ असणारी संख्या यावर्षी तब्बल 63 झाली आहे. नसबंदीबाबतचे गैरसमज दूर होऊन आता पुरुष पुढाकार घेऊ लागले आहेत. ही समाधानाची बाब आहे. एकीकडे लोकसंख्येला आळा तर बसतोच, दुसरीकडे स्त्रियांच्या वाट्याला येणारी नसबंदीची शस्त्रक्रिया कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. 2017 पासून यावर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत या सात वर्षात जिल्ह्यात 40 हजार 474 महिलांनी शासकीय रुग्णालयांत नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. तसेच याच कालावधीत 86 पुरुषांनी नसबंदी केली आहे. महिलांच्या तुलनेत हा आकडा कमी दिसत असला तरी यापूर्वी पुरूष नसबंदीचा वर्षात दोन, चार अशी असणारी आकडेवारी फे ब्रुवारीतच 63 झाली आहे. अर्थात यामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेचे मोठा वाटा आहे.

शासनाकडून मिळतो आर्थिक लाभ

कुटुंब नियोजन या योजनेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करणार्‍या लाभार्थ्यांस केंद्र शासनाकडून 1 हजार 100 आणि राज्य शासनाकडून 351 असे एकूण 1 हजार 4 51 रुपये दिले जातात. तसेच स्त्रियांनी नसबंदी केल्यानंतर एसटी, एसी, बीपीएल प्रवर्गातील लाभार्थ्यांना 600 रुपये आणि दारिद्य्ररेषेखालील लाभार्थ्यांना 250 रुपयांचा लाभ दिला जातो.

कुटुंब नियोजनाच्या पद्धती

स्त्री नसबंदी – ही कायमस्वरूपाची कुटुंब नियोजनाची पद्धत आहे. यामध्ये टाक्याची व बिनटाक्याची असे शस्त्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. बिनटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (एनएसव्ही) – ही कायमस्वरुपी पुरुष कुटुंब नियोजनाची पद्धत आहे. बिनटाका पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा सोपी आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळ लागत नाही. शस्त्रक्रियेनंतर 48 तासांनी सर्वसाधारण कामे सुरू करता येतात.

पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे फायदे

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही अत्यंत साधी व सोपी शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेनंतर 48 तासांनी सर्वसाधारण कामे सुरू करता येतात. ही शस्त्रक्रिया भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा करता येते. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news