सांगली : बैलगाडी शर्यतीत ‘रुस्तम ए हिंदकेसरी’ चा मान बकासुर-महिब्या जोडीला; सदाभाऊ कदम यांना महिंद्रा ‘थार’ ! | पुढारी

सांगली : बैलगाडी शर्यतीत 'रुस्तम ए हिंदकेसरी' चा मान बकासुर-महिब्या जोडीला; सदाभाऊ कदम यांना महिंद्रा 'थार' !

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील भाळवणी (ता. खानापूर) येथे आयोजित केलेल्या देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडी शर्यतीत सातारा जिल्ह्यातील रेठरे येथील सदाभाऊ कदम यांच्या बकासुर-महिब्या या जोडीने ‘रुस्तम ए हिंदकेसरी’ चा मान पटकावला. त्यांना पहिल्या क्रमांकाचे १९ लाख रुपये किमतीच्या महिंद्रा ‘थार’ गाडीचे बक्षीस मिळाले.

भाळवणी (ता. खानापूर) येथे आज रविवारी (दि. ९) देशातील सर्वांत मोठी बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फौंडेश नच्यावतीने करण्यात आले होते. भाळवणी हद्दीतील ढवळेश्वर-शेळकबाव रस्त्यावरील मुल्लानगर येथे ही शर्यत झाली. शनिवारी (दि.८) सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे स्पर्धा वेळेवर सुरू होणार की नाही याबद्दल थोडी अनिश्चितता होती. परंतु, नेटक्या आणि काटेकोर संयोजनामुळे आज दुपार पासून शर्यतीचे राऊंड्स सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत शर्यत चालू होती, रात्री साडे नऊ वाजता शर्यतीची अंतिम फेरी झाली.

बैलगाडी शर्यतीची सुरवात गोमाते च्या पूजनाने करण्यात आली. प्रेक्षकांच्या सोयीच्या दृष्टीने बैलगाडी धावणाऱ्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूने साईडला प्रेक्षक गॅलरी उभारली होती. शिवाय निकालामध्ये कोणताही गडबड होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरासह स्क्रीनही लावण्यात आले होते. यावेळी हजारो कुस्ती आणि बैलगाडी प्रेमींनी गर्दी केली होती.

प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास महिंद्रा कंपनी ची ‘थार’ बक्षिस, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी दुचाकी, सहाव्या क्रमांकासाठी ई बाईक देण्यात आली. तसेच इतरही अनेक बक्षिसे दिली गेली. सहभागींना देखील मानाची गदा आणि गुलाल देण्यात आला.

या शर्यतीला सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर,खासदार संजय पाटील, आमदार निलेश लंके,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,वैभव पाटील यांच्यासह अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावली.

विजयी बैलगाडीचे मालक आणि संघ असे

प्रथम क्रमांक : महिंद्रा थार गाडीचे मानकरी सदाभाऊ कदम (मास्तर) रेठरे (ता कराड), संभाजी आबा काले यांचा महिब्या हा बैल आणि मोहित शेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुसगावकरांचा बकासुर बैल.

द्वितीय क्रमांक : पुण्याच्या नांदेड सिटी येथील जीवन आप्पा देडगे, बबनदादा ल्हासुर्णे यांचा रोमन हा बैल आणि अधिक पैलवान कळंबी सुमितशेठ भाडळे यांचा शंभु हा बैल.

तृतीय क्रमांक : सांगव -डोंबिवली येथील गुड्डी रतन म्हात्रे यांची मॅगी आणि वजीर ही बैल जोडी.

चतुर्थ क्रमांक : सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर हा बैल आणि जीवन निनाम यांचा सुंदर हा बैल

पाचवा क्रमांक : नियती भीमराव बुधकर यांचा सूर्या हा बैल आणि पुणे वारजे येथील राहुलशेठ चौधरी रायबान हा बैल.

सहावा क्रमांक : गोट्याभाई तडसर,दीपक शेठ चिरले, राहुलभाई पाटील यांचा तेजा हा बैल आणि आदईकरांचा बिरज्या हा बैल.

सातवा क्रमांक : कराड तालुक्यातील तांबवे येथील जावेद मुल्ला यांचा सर्जा आणि पाली गावचा रणवीर हा बैल.
हेही वाचा;

Back to top button