जुन्यांना सामावून घ्या; अन्यथा भाजपची काँग्रेस होईल; जुन्या कार्यकर्त्यांचा इशारा | पुढारी

जुन्यांना सामावून घ्या; अन्यथा भाजपची काँग्रेस होईल; जुन्या कार्यकर्त्यांचा इशारा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षसंघटना व सत्तेत सामावून घ्या, अन्यथा भाजपची काँग्रेस होईल, असा इशारा पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सांगलीत भाजपच्या अमृतकुंभ अभियान बैठकीत दिला. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्यांचेच लाड होत असल्याची भावना जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा जोरात आहे.

उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियानांतर्गत शनिवारी सांगलीत टिळक स्मारक मंदिर येथे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. भाजपचे नेते माजी आमदार मधू चव्हाण हे प्रदेश भाजपचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील जुन्या व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या व्यथा, समस्या ऐकून घेण्यासाठी आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सांगलीत आले होते. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संघटन सरचिटणीस मिलिंद कोरे तसेच जुने, निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींना या बैठकीपासून दूर ठेवले होते.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य काही राजकीय पक्षांमधून आलेल्या नेते, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये पक्षसंघटना व सत्तेची पदे दिली. सन 2012 पूर्वीच्या भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारले. पक्षाच्या प्रतिकूल काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली. पक्ष वाढीसाठी काम केले, तेच बाजूला पडले आणि आयात नेत्यांना संधी दिली, अशी भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात आणि सत्तेत सामावून घ्या, अन्यथा भाजपची काँग्रेस होईल. सर्वांना गृहीत धरून राजकारण केले जाऊ नये. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेतली जावी’ अशा भावनाही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

भाजपला देशभरात चांगले वातावरण झाले. हे वारे पाहून अन्य पक्षातील काही नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यांचा तो राजकीय स्वार्थ होता. मात्र पक्षात नव्याने आलेल्यांनाच पक्ष संघटना, सत्तेत महत्वाची पदे दिली. पक्षासाठी अनेक वर्षे मशागत करणारे बाजूला पडले. नव्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना जुमानले नाही. त्यामुळे आम्ही पक्षापासून दुरावलो आहोत, अशी भावनाही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. दरम्यान नव्या व जुन्यांचा समन्वय करू, असा विश्वास माजी आमदार मधू चव्हाण यांनी जुन्या कार्यकर्त्यांना दिला.

जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह : चव्हाण

माजी आमदार मधू चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला जनसंघापासूनचे कार्यकर्ते होते. काश्मिरसंदर्भातील 370 कलम हटवणे, राम मंदिर उभारणे, समान नागरी कायदा हे या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. त्यांची ही स्वप्ने सत्यात उतरत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

Back to top button