सांगली : जिल्ह्यात आठवड्याला एकाचा ‘मुडदा’! | पुढारी

सांगली : जिल्ह्यात आठवड्याला एकाचा ‘मुडदा’!

सांगली; सचिन लाड :  जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात दहा ते बारा जणांचा ‘मुडदा’ पाडण्यात आला. सरासरीचा विचार केल्यास आठवड्याला कुठे-ना-कुठे एकाचा तरी ‘मुडदा’ पाडला जात आहे. 20 जणांचा ‘हाफ मर्डर’ करण्यात आला. खून आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातून 44 नवे गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.

जत तालुका हादरला!

अनैतिक संबंध, आर्थिक वाद, प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद, चारित्र्याचा संशय, टोळीयुद्ध, शेतातील विहिरीचा वाद, पूर्ववैमनस्य ही खुनामागची कारणे स्पष्ट झाली आहेत. जत येथे मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेलेले भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाली. या खुनातील मुख्य सुत्रधार उमेश सावंत हा अजूनही फरारीच आहे. कोसारी (ता. जत) येथे सामाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून दोघांचा कुर्‍हाडीने हल्ला करून मुडदा पाडण्यात आला. या घटनेने जत तालुका हादरून गेला.

खुनाची मालिकाच!

वाघोली (ता. कवठेमहांकाळ) येथे गाडी घासून मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून बाळासाहेब शिंदे या वृद्धाचा बळी घेतला. आष्टा (ता. वाळवा) येथे ओंकार रकटे याचा गळा आवळून खून केला. एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांना रातोरात त्याचा मृतदेह स्मशानभूमित जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने जिल्ह्यात आठवड्याला कुठे-ना-कुठे एखाद्याचा मुडदा पाडला जात आहे. पोलिसांचा तपास गतीने होतो. संशयितांना अटक केली जाते. मात्र खून आणि खुनाचा प्रयत्न या दोन गुन्ह्यातील नवे गुन्हेगार रेकॉर्डवर आले आहेत.

साक्षीदारांवर दबाव

अनेक गुन्ह्यातील संशयित गुन्हेगार जामिनावर बाहेर आल्यानंतर साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. यातून त्यांच्यातील संघर्ष वाढत जातो. परिणामी पुढे-मागे आणि कुणाचा तरी ‘मुडदा’ पडला जातो. सातत्याने खून आणि खुनाच्या प्रयत्नाची मालिका सुरू राहत असल्याने अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जीवघेणे हल्ले सुरूच!

खुनाच्या घटनांच्या आलेखामध्ये नेहमीच चढ-उतार राहिला आहे. याचबरोबर खुनी हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या तीन-चार महिन्यात 21 जणांवर जीवघेणा हल्ला झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. बहुतांश घटनांमागे किरकोळ कारण असल्याचे समोर आले आहे.खून आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातून 44 नवे गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. त्याना ठेवण्यासाठी कारागृह अपुरे पडू लागले आहे.

Back to top button