सांगली : कार-टँकरच्या अपघातात इस्लामपूरचे नवदाम्पत्य ठार

सांगली : कार-टँकरच्या अपघातात इस्लामपूरचे नवदाम्पत्य ठार

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकातील शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी कुटुंबासह गेलेले नवदाम्पत्य कार-टँकर अपघातात जागीच ठार झाले. हा अपघात हलूर (ता. मुडलगी, कर्नाटक) जवळील जत-जांबोटी महामार्गावर शनिवारी झाला. कुटुंबातील अन्य दोघे जखमी झाले. इंद्रजित मोहन ढमणगे (वय 29), कल्याणी इंद्रजित ढमणगे (वय 24, दोघे रा. किसाननगर, इस्लामपूर) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. इंद्रजित यांचे वडील मोहन (वय 65) व आई मिनाक्षी (वय 59) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंद्रजित व कल्याणी यांचा दि. 18 मार्च रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर इंद्रजित, कल्याणी व आई, वडील हे कारने कर्नाटकातील शाकंभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. शनिवारी दुपारी देवाचे दर्शन घेऊन परतत असताना गुर्लापूर (ता. मुडलगी) जवळील हलूर येथे आले असताना समोरून येणार्‍या टँकरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. यामध्ये कार पलटी झाली. इंद्रजित व कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. जादा रक्तस्त्राव झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मोहन व मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले. मोहन यांचा हात फ्रॅक्चर असून त्यांच्या डोक्यालाही गंभीर मार लागला आहे. मिनाक्षी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्या डोक्यालाही मार लागला आहे. कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी आहे. इंद्रजित हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीला होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news