सम आर मोअर इक्वल का? : अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफमुळे रुग्णांचा जीव धोक्यात

सम आर मोअर इक्वल का? : अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफमुळे रुग्णांचा जीव धोक्यात
Published on
Updated on

सांगली; गणेश मानस :   रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारी व्यक्ती म्हणजे नर्स असते. एखादा रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर त्याला डॉक्टर येईपर्यंत 'जिवंत' ठेवण्याचे काम नर्सचे असते. त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व वैद्यकीय उपकरणाचा वापर करून प्राथमिक उपचार करीत असते. शरीरामध्ये होणार्‍या बदलाची सर्व माहिती एकत्रित करून ती उपचारासाठी येणार्‍या डॉक्टरला पुरविण्याचे काम नर्स करीत असते. त्यामुळे नर्स ही प्रशिक्षितच असावी, असे गृहीत आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील सुमारे 50 टक्के रुग्णालयांचा विचार करता बहुसंख्य रुग्णालये ही अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफवर चाललेली दिसून येतात. या अप्रशिक्षित स्टाफमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या तक्रारीही आहेत.

2015-16 नंतर सरकारने हॉस्पिटलबाबतचे नियम कडक केले. त्यासंबंधित पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. रुग्णांचे जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक रुग्णालयात विभागानुसार त्या त्या योग्यतेचा नर्सिंग स्टाफ असावा, असे सुचविले. याची पाहणी करण्यासाठी नॅक अ‍ॅक्रिडेशन समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अनेक रुग्णालयांनी प्रशिक्षित स्टाफ नेमण्यास सुरुवात केली. परंतु रुग्णालयाच्या पाहणीमध्ये अजूनही 50 टक्के रुग्णालयांत अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफ असल्याचे दिसून येते आणि हे रुग्णांच्या जीवासाठी घातक आहे.

रुग्णांचे जीव गेल्याच्या तक्रारी

खासगी रुग्णालयात अत्यवस्थ असलेले रुग्ण दाखल होत असतात. त्यांची अवस्था पाहून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याची जबाबदारी ही नर्स स्टाफची असते. एका रुग्णालयात अ‍ॅपेंडीक्ससाठी रुग्ण दाखल करण्यात आला. त्याची सोनोग्राफी काढण्यात आली. त्यानंतर रुग्णाला उपचारासाठी घेतल्यानंतर पोटातच अ‍ॅपेंडीक्स फुटल्याचे दिसले. वास्तविक चुकीच्या पद्धतीने सोनोग्राफी अहवाल आणि चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला जीव गमवावा लागला. अप्रशिक्षित स्टाफमुळे रुग्णांचे जीव गेल्याच्या तक्रारीही महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या आहेत; परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

काही रुग्णालयांत अप्रशिक्षित स्टाफच सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, रुग्णाला गोळ्या देण्याचे काम करीत असतात. त्यामुळे सलाईन नीट लावता न येणे, रक्तवाहिनी न सापडणे, बी.पी. नीट न चेक करता येणे, शुगर चेक न करता येणे असे प्रकार नेहमीचे घडत असतात. अप्रशिक्षित नर्स असल्यामुळे आलेल्या रुग्णांबरोबर संवाद नीट ठेवला जात नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि स्टाफ यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असतात. एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे रुग्णालयात काम करीत असते. त्यातून ती काही गोष्टी शिकत असते. एवढ्या अनुभवावर ती उपचाराच्या गोष्टी करीत असते. परंतु, रुग्णांमध्ये काही गंभीर गोष्टी दिसून आल्यातर मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

बाळंतपणासाठी प्रशिक्षितच स्टाफ हवा

बाळंतपणाच्या रुग्णालयात पूर्वी दाईची नेमणूक केली जायची. दाई ही अनुभवाने शिकून महिलेची डिलिव्हरी करीत असते. बहुसंख्य डिलिव्हरी ही नार्मल होत असते. परंतु सध्या लग्नाचे वाढलेले वय, बदलती जीवनशैली, व्यसने आणि इतर आजारांमुळे बहुसंख्य डिलिव्हरी या 'सिझर' पद्धतीने होतात. यामध्ये बाळाची नाळ अडकणे, हृदयाचे ठोके कमी असणे, कमी कालावधीत बाळ जन्मने यामुळे बाळंतपणे ही प्रशिक्षित स्टाफकडून होणे अपेक्षित आहे. परंतु काही रुग्णालयांतील बाळंतपणेही अप्रशिक्षित स्टाफमार्फत केली जातात आणि रुग्णाचा जीव धोक्यात येत असतो.

एका स्टाफकडे 25 रुग्णांची जबाबदारी

रुग्णालयात उपचार आणि सेवेची रचना करताना प्रशिक्षित नर्सकडे आयसीयूमध्ये दोन रुग्णांची व जनरल वॉर्डमध्ये चार रुग्णांच्या सेवेची जबाबदारी हवी. परंतु रुग्णालयात हा नियम पाळला जात नाही. कमी स्टाफवर काम करून घेतले जाते. एकेका स्टाफकडे 25 रुग्णांच्या सेवेची जबाबदारी दिली जाते. याबरोबरच रुग्णांच्या आजाराबाबतच्या नोेंदी ठेवणे आणि उशिरापर्यंत काम करून घेतले जाते. यामध्ये अप्रशिक्षित स्टाफचाही भरणा असतो. या सर्वांचा परिणाम हा
रुग्णांच्या उपचारावर होत असल्याच्या तक्रारी आहेत.

प्रत्येक विभागासाठी प्रशिक्षित नर्स हवी…

रुग्णावर उपचार करीत असताना नर्सिंग स्टाफ महत्वाचा मानला जातो. त्यामुळे तिला 70 ते 80 टक्के नॉलेज हे डॉक्टरएवढे असावे, असे अपेक्षित असते. रुग्णांचा जीव वाचविणे, रुग्णाला स्टेबल करण्याचे काम नर्सिंग स्टाफ करीत असतो. रुग्णाला अचानक धाप लागते, बी. पी. मॉनिटरींग, टी.पी.आर, कार्डियाक तपासणी, सलाईन लावणे, हृदयाच्या ठोक्यावरून उपचाराबाबत अंदाज घेणे, वेगवेळ्या परिस्थितीतील रुग्णांशी काय बोलावे, त्यांना धैर्य कसे द्यावे, त्यांना मानसिक आधार देणे ही कामे महत्त्वाची असतात. त्यासाठी नर्सचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. आरएएनएम (रिवॉयजड् ऑझिलरी नर्सिंग मिड वाईफ), आरजीएमएच (रिव्हायजड् जनरल नर्सिंग ऑफ मिड वाईफ), बीएस्सी नर्सिंग, पी.जी. नर्सिंग, एमएस्सी नर्सिंग, डॉक्टरेट नर्सिंग, ऑपरेशन नर्सिंग (ओटी), कार्डियाक नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्स, सायकियार्टी नर्सिंग, काऊन्सिलिंग नर्स, रिसर्च, एज्युकेशनल, इन्व्हेंटर नर्स असे अत्याधुनिक पद्धतीने डिझाईन केलेले नर्सिंगचे कोर्सेस आहेत. वास्तविक पाहता हे प्रशिक्षण घेतलेलाच स्टाफ हवा आहे.

कमी पगारात राबतोय नर्सिंग स्टाफ

प्रशिक्षित नर्सिंग स्टाफची नेमणूक करायची असेल तर शासनाने त्यांचे वेतन ठरवून दिलेले आहे. परंतु जास्त वेतन द्यावे लागत असल्यामुळे तुटपुंज्या वेतनात प्रशिक्षित व अप्रशिक्षित दोन्ही स्टाफकडून कामे करून घेतली जातात. प्रशिक्षित स्टाफसाठी आरएएनएम स्टाफ : 10 ते 12 हजार, जीएएनएम : 15 ते 18 हजार, बीएस्सी नर्सिंग : 20 ते 22 हजार, एमएस्सी : 25 ते 70 हजार तरतूद आहे. परंतु एवढे वेतन देण्याऐवजी 7 ते 8 हजार इतक्या कमी वेतनात अप्रशिक्षित स्टाफ नेमले जातात. त्यांच्याकडून सलाईन लावण्यापासून ओटीमध्ये सहाय्यक म्हणून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. अनेक ठिकाणी साहित्य स्वच्छ करणारे आले नाही, तर त्यांच्याकडून ही कामे करून घेतली जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news