सांगली : जिल्ह्यात शाळूची धारणा लागली वाढू! | पुढारी

सांगली : जिल्ह्यात शाळूची धारणा लागली वाढू!

सांगली; विवेक दाभोळे :  जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे (शाळू) क्षेत्र घटले आहे. त्यातच यावेळी एकरी उतारा घटू लागला आहे. परिणामी आता ज्वारीची धारणा वाढू लागली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यासह मिरजपूर्व भागात रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र दोन हंगामापासून या भागात देखील पाणी योजनांचे पाणी आले आहे. परिणामी शेतकरी वर्गाचा कल हा बागायती पिकांकडे वाढू लागला आहे.

सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी जवळपास 2 लाख 57 हजार 692 हेक्टर सरासरी क्षेत्र होते. संपलेल्या रब्बी हंगामात ज्वारीचे उपलब्ध क्षेत्र होते. पैकी हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. मात्र दोन वर्षांपासून जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. खास करून सिंचन योजनांच्या आवर्तनामुळे पूर्वभागात पाण्याची हमी राहिली आहे. यातून ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. धान्य व कडब्याच्या रूपाने रब्बी ज्वारीची दुहेरी उपयुक्तता ठरते. दुभत्या जनावरांना लागणारा चारा देखील यातून चांगला मिळतो.

 जिल्ह्यात प्रचलित वाण 

जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे फुले चित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी, फुले – यशोदा, परभणी ज्योती, फुले अनुराधा हे सुधारित व संकरित वाण प्रचलित आहेत. मात्र अनेक शेतकरी पारंपरिक बियाणास पसंती देतात. साधारणत: सरासरी 110 ते 130 दिवसात हे पीक काढणीस येते. ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाला आणि थाटाचा पाला वाळल्यास म्हणजे पीक कापणीस सुरुवात होते. आता अनेक भागात ज्वारीची कापणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मळणी पूर्ण होत आहे.

      उत्पादकता लागली घटू

कोरडवाहू रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारण 18 – 20 क्विंटल मिळते. मात्र बागायती रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारण 45-50 क्विंटल मिळते. रब्बी कोरडवाहू क्षेत्रात धान्यांपेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीन पट कडब्याचे उत्पादन मिळते. पण यावेळी एकरी उतारा हा जेमतेम 11 ते 12 क्विंटल इतकाच कसाबसा राहू लागला आहे.

Back to top button