खासदारकी रद्दमागील षड्यंत्र जनतेपर्यंत पोहोचवणार : सतेज पाटील | पुढारी

खासदारकी रद्दमागील षड्यंत्र जनतेपर्यंत पोहोचवणार : सतेज पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दमागील भाजपचे षड्यंत्र जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प सत्याग्रह हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका, गाव, प्रभागस्तरावर कोपरा सभा होतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, शेल कंपन्यांच्या माध्यमातून अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. ज्वाईंट पार्लमेंटरी कमिटी (जेपीसी) नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. ही मागणी भाजप व प्रधानमंत्री यांना गोत्यात आणणारी होती. त्यामुळे जुनी केस उकरून कोर्टात ती अचानक बोर्डावर आणली. निर्णय दिला. राहुल गांधी यांना चार महिने, सहा महिन्यांची शिक्षा देता आली असती, पण दोन वर्षांची शिक्षा देणे आणि लोकसभा सचिवालयाने तातडीने खासदारकी रद्द करण्याची कार्यवाही करणे यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्ताधार्‍यांविरोधात बोलले की सदस्यत्व घालवले जाते, हे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. त्याचा निषेध केला जात आहे. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी भाजपविरोधात ताकदीने आंदोलन केले जाणार आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमागील भाजपचे षडयंत्र जनतेसमोर मांडले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर पत्रकार परिषद, गाव व शहरात प्रभागस्तरीय कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात, शहरात विरोधकांकडून काँग्रेस तोडायचे, मोडायचे प्रयत्न होतील, पण त्यात त्यांना त्यात यश येणार नाही, असेही सतेज पाटील यांनी एका प्रश्नावर सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील उपस्थित होते.

कोल्हापुरात मविआची सभा

सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट यांच्यात चांगला समन्वय आहे. पुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल. विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागल्यास त्यास यशस्वीपणे सामोरे जाण्यास महाविकासआघाडी सक्षम व तयार आहे. महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा दि. 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. अमरावती, नागपूर, पुणे येथेही सभा होईल. सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांची सभा दि. 28 रोजी कोल्हापूर येथे होईल.

Back to top button