सांगली : तुषार सुभेदार ठरले जागतिक विक्रमवीर | पुढारी

सांगली : तुषार सुभेदार ठरले जागतिक विक्रमवीर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील तरुण गिर्यारोहक तुषार सुभेदार यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत आफ्रिका खंडातील टांझानियामधील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले. तब्बल 19 हजार 341 फूट उंचीचे हे शिखर आहे. शिखरावर 25 फूट लांब भगवा ध्वज फडकवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वरावरील सात रंगाची माती नेऊन शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. त्यांच्या या कामगिरीची नोंद ‘हाय रेंज ऑफ बुक वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये तसेच ‘इंडिया बुक ऑफ रेकार्डस्’ मध्ये झाली आहे. यामुळे सांगलीचे सुपूत्र सुभेदार हे जागतिक विक्रमवीर बनले आहेत.
सुभेदार यांनी या मोहिमेच्या माध्यमातून 360 एक्सप्लोररमार्फत सात महाद्वीपामधील पहिले शिखर सर केले. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचा 360 एक्सप्लोरर हा भारतातील सर्वात टॉपचा अ‍ॅडव्हेंचर ऑर्गनायझर ग्रुप आहे. भारत सरकारमार्फत स्टार्टअप इंडिया प्रमाणित आहे. सुभेदार म्हणाले, आपण नोकरी करतानाच ट्रेकिंगची आवड जोपासली. हा विक्रम आपण वडील प्रभाकर सुभेदार, आई सुनीता सुभेदार, प्रकाश पाटील, विश्वास पाटील, सुषमा पाटील, मीना मदने, दिवंगत मामा साठे यांना समर्पित करतो.

दरम्यान, सुभेदार यांची जागतिक रेकॉर्ड तपशील प्रमाणे किलीमांजारो पर्वतावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि रायरेश्वर किल्ल्यावरील सात रंगाची माती प्रदर्शित करणारे पहिले भारतीय त्याचप्रमाणे किलीमांजारो पर्वतावर सर्वात लांब भगवा ध्वज फडकवणारे पहिले भारतीय अशी नोंद झाली आहे.

Back to top button